

मुंबई: एक तपाच्या पाठपुराव्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पदरात पडणाऱ्या निधी आणि लाभासाठी अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज इन क्लासिकल मराठी) स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली.
मराठी भाषेचेे हे उत्कृष्टता अध्ययन केंद्र हे पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात असणार आहे. मराठी भाषा अभिजात दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रसरकारने मराठी सह आसामी, बेंगाली, पाली आणि प्राकृत भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्रास मंजुरी दिली.
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या अभिजात मराठी समितीने केंद्र सरकारला अहवाल दिल्यानंतर सुमारे एक तपानंतर २ ऑक्टोबर २०२४ ला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला.
केंद्र सरकारच्या अभिजात भाषेच्या संदर्भातील प्रचलित धोरणानुसार अभिजात भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या ध्येयधोरणासाठी म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थेच्या अधिपत्याखाली अभिजात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापन करण्याच्या तरतुदीनुसार राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने वर्षभराच्या आत केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडे या केंद्रासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सप्टेंबर २०२५ मध्ये सादर केला होता.
मात्र दोन वर्षे होत आले तरी या केंद्रास मंजूरी मिळविण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने पाठपुरावा सुरू होता. या मंजूरीनुसार डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यास मंजुरी प्राप्त झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी समाज माध्यमावर दिली.
म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थेच्या अधिपत्याखाली कार्यरत अभिजात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्राच्या वतीने अहवाल सादर करावा लागणार आहे. मराठीच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्प, केंद्र आणि राज्य सरकारच्या तज्ज्ञांच्या समित्या नियुक्त कराव्या लागतील.
अभिजात भाषेचा दर्जा बहाल केल्यानंतर हे केंद्र स्थापन करून अभ्यास सुरू होणे हा भाषसंवर्धनातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या काव्यातील शब्दांचा आधार घेत फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज इन क्लासिकल मराठी) स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. शुक्रवारी हा निर्णय झाला. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाला. आता भाषा संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध होईल.
या केंद्रासंबंधीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी सुरू केले होते. आता तो अहवाल केंद्राकडे सादर करून आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे.
अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आम्हा सर्व नागरिकांना अत्यानंद होतो आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र, देश आणि जगभरातील मराठीजनांसाठी ही बातमी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची असल्याचे सांगत या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.