

मुंबई :राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या साडेतीन लाख कर्मचार्यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी आपले एकदिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला दिले आहे. ही रक्कम 50 कोटीपर्यंत आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट ओढावले असून, अनेक जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ पडला आहे. अनेकांची घरे, शेती, जनावरे व उपजीविकेची साधने वाहून गेल्यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील आपल्या बांधवांना मदतीचा हात दिला आहे.
या कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना निवेदन दिले असून, त्याच्या प्रती शासनाचे मुख्य सचिव आणि अपर मुख्य सचिव (वित्त) यांना दिले असल्याची माहिती चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण व सरचिटणीस बाबाराम कदम यांनी दिली.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनेही कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी कपात करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले आहे. या संघटनेचे अ आणि ब गटाचे मिळून एक लाख दहा हजार कर्मचारी आहेत. त्यांचे एक दिवसाचे वेतन 54.33 कोटी भरते.