

मुंबई: शैक्षणिक सत्र 2026-2027 साठी इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून अवघ्या दोन दिवसांत राज्यभरातून तब्बल 58 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागाची नोंदणी केली आहे. ही नोंदणी 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या केंद्रीय ऑनलाईन प्रणालीमध्ये गेल्या वर्षी अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. मात्र यंदा प्रवेश प्रक्रिया अधिक सुरळीत व्हावी यासाठी शिक्षण संचालनालयाने पूर्वतयारी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश अर्जाचा भाग-2 मात्र दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच सुरू होणार असल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य मंडळाबरोबरच इतर मंडळांतून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
17, 18 एप्रिल रोजी विशेष मार्गदर्शन शिबीर
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा दुसरा भाग भरण्यापूर्वी व दहावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी मुंबई विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपली नोंदणी अद्ययावत करणे बंधनकारक आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन 17 आणि 18 एप्रिल रोजी चर्नीरोड आणि ठाण्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.