

Marakadwadi Citizens Agitation vs EVM
मुंबई : EVM विरोधात सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील नागरिक आज (दि.७) आक्रमक झाले. विधानभवनाबाहेर त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु नागरिक काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक हातात फलक घेऊन आले होते. ते जोरजोरात घोषणाबाजी देत होते. पोलिसांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांची घोषणाबाजी सुरूच राहिली. अखेर पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेतले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमविरोधात मारकडवाडीतील नागरिक एकवटले आहेत. ईव्हीएममधील कथित छेडछाड प्रकरणी देशभर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी होत आहे. या मशीनमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी ठेवल्या असल्याने निवडणूक आयोग आमच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही. याच्या निषेधार्थ मारकडवाडी येथे देशातील सर्वात मोठे आंदोलन करण्यात आले. तरीही निवडणूक आयोगाने याकडे कानाडोळा केला आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही.
दरम्यान, ईव्हीएमविरोधात मारकडवाडीतील नागरिकांनी लढा उभारला होता. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला होता. तसेच निवडणूक आयोगाने मतदान पत्रिकेवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. परंतु, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नव्हती. अखेर निवडणूक आयोगाच्या धोरणासंदर्भात सामान्यांच्या मनात असलेली खदखद व आक्रोशाला वाट मोकळी करून देण्यासाठी दि. 19 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान मारकडवाडी ते मुंबईतील शिवाजी पार्क अशा लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले होते.