

वेळापूर : गेली काही दिवसांपासून ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या धोरणासंदर्भात सामान्यांच्या मनात असलेली खदखद व आक्रोशाला वाट मोकळी करून देण्यासाठी दि. 19 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान मारकडवाडी ते मुंबईतील शिवाजी पार्क या दरम्यान लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देशभरातील प्रमुख नेते येणार असून त्याबाबतचा संपूर्ण आराखडा दोन दिवसांत तयार होणार, अशी माहिती माळशिरसचे आ. उत्तम जानकर यांनी वेळापूर निवासस्थानी दिली.
आ. जानकर म्हणाले, ईव्हीएमबाबतचा मारकडवाडीचा आक्रोश संपूर्ण देशाने पाहिला आहे. तेव्हापासून देशभर बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी होत आहे. या मशीनमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी ठेवल्या असल्याने निवडणूक आयोग आमच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही. यासाठी मारकडवाडी येथे देशातील सर्वात मोठे आंदोलन होऊन सुद्धा निवडणूक आयोग कारवाई करत नाही व त्याची दखलही घेत नाही. यामुळे या लाँग मार्चमध्ये लोकशाही प्रगल्भ व निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राहावी, असे वाटते अशा सर्व जनतेने व महाविकास आघाडीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कवर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजपने वाढविलेले हे कथित मतदार काल दिल्लीत तर परवा हरियाणा,महाराष्ट्रात होते. उद्या पंजाब, बिहार आदी ठिकाणी हे असणार आहेत. यामुळे निवडणूक आयोगा सारख्या संस्थांना त्या स्वायत्त आहेत याची जाणीव यातून करून दिली जाणार असल्याचे सांगून आ. जानकर म्हणाले, जर भाजपने एवढी चांगली कामे केली आहेत. तर व्हीव्हीपॅट मधील पावती आम्हाला मतदान पेटीमध्ये हाताने टाकू द्या. त्यामुळे निवडणूक आयोगाला अडचण येण्याचे कारण नाही. त्यासाठी या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्यामध्ये लोकसभेच्या पाच व विधानसभेच्या पाच मतदार केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करण्याची मागणी करणार आहोत. महाराष्ट्रातील वाढलेल्या 76 लाख मतदारांचा हिशोब मागणारी याचिकाही नुकतीच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केली आहे. त्यामुळे आयोगाला या आमच्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागणार आहे.
लाँगमार्च नातेपुते, शिरूर, पुणे मार्गे मुंबईला जाणार आहे. यामध्ये रोज संध्याकाळी मुक्कामी जाहीर सभा घेऊन जनजागृती केली जाणार आहे.