पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद आता वाघ विरुद्ध महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर असा चिघळला आहे. महिला आयोगाने पाठविलेल्या नोटिशीबाबत चित्रा वाघ यांनी उपरोधिक टीका करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची खिल्ली उडवली आहे. चित्रा वाघ यांनी खोचक ट्विट करत या नोटिशीने आपल्याला काही फरक पडत नसल्याचा अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे, "स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीशीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..! असं खोचक ट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.
आपल्या हटके फॅशनमुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. गेले काही दिवस ती चर्चेत आली आहे. कारण भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तिच्या सार्वजनिक ठिकाणावरील पेहरावावर टीका करत. मुंबई पोलिसांना अटक करण्यास सांगितले होते. तसेच महिला आयोगाने तिच्यावर अद्याप कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली यांना या वादात ओढले होते.
चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडियावरील वॉर सुरु असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही एक ट्विट करत या वादात उडी घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही "राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले." असं खोचक ट्विट केले. हे सुरु असतानाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी (दि.६) चित्रा वाघ यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये त्यांनी महिला आयोगाची स्थापना करण्याचा उद्देशासह, अधिकार, कार्ये नमूद केली आहेत. पुढे म्हंटलं आहे की,"ज्याअर्थी आपण एका महिलेच्या पेहेरावाबाबत दि.०५.०१.२०२३ रोजी पत्रकार परिषदेद्वारे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अप्रतिष्ठा होईल अशी वक्तव्ये केली आहेत, त्याचप्रमाणे यापूर्वीच्या एका प्रकरणात आयोगाने काढलेल्या नोटीशीचे चुकीचे अन्वयार्थ लावून ही नोटीस प्रसार माध्यमांसमोर प्रदर्शित करुन आयोगाच्या कामकाजाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल, असे वर्तन केले आहे.
तसेच यावेळी आपण दोन महिलांच्या विभिन्न प्रकरणांची हेतू पुरस्पर तुलना करुन दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्याअर्थी प्रस्तुत नोटीशीद्वारे आपणास निर्देशित करण्यात येते की, आयोगाचा अवमान केल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ कलम १२(२) व १२(३) नुसार आयोगास दोन दिवसात प्राप्त होईल, अशारितीने खुलासा सादर करावा अन्यथा या प्रकरणी आपले काही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरुन एकतर्फी कार्यवाही करण्यात येईल."
नोटीशीनंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत रुपाली चाकणकर उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,"स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीशीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..! जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला न देता, हा नंगानाच होऊ देणार नाही… अशी भूमिका घेणारीला पाठवली. असो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार..!!जय हिंद …जय महाराष्ट्र …!!"
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या अशा उपरोधिक टीकेनंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका काय असणार आहे यावर राजकीय वर्तूळासह सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत.