.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या हाती काहीही लागले नाही. आता तर शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ते असणार नाहीत. शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे हे जवळजवळ शिजत असून, त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, अशी टिपणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या टिपणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यावरून सुरू असलेल्या वादावर फडणवीस यांनी खोचक टीका केली. महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करणार नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा आणि तोही माझा असावा, यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. ते दिल्लीत असताना त्यांनी सोनिया गांधींबरोबर चर्चा केली; पण या बैठकीचा फोटो काढण्याची परवानगी गांधींनी दिली नाही, असे फडणवीस म्हणाले.
आमच्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्यावरून वाद नाही, असे उत्तर फडणवीस यांनी देत एकनाथ शिंदे राज्याचे प्रमुख आहेत. जी व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर असते तीच निवडणुकीत नेतृत्व करते. विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल, याबाबत मी सांगू शकत नाही. तो अधिकार आमच्या पक्षाच्या संसदीय मंडळाचा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा असेल, असेही फडणवीस म्हणाले.
विरोधक चक्रव्यूह करून माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असले, तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूहात कसे शिरायचे हे मला माहीत आहे आणि बाहेर कसे यायचे आहे, हेही माहीत आहे. काहीही झाले तरीही माझा अभिमन्यू होणार नाही, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. मला अशा पद्धतीने टार्गेट केले जातेय. यातून ते मला किती मोठा नेता मानतात ते स्पष्ट होते, असे फडणवीस म्हणाले.