मुंबई : पुढारी वृत्तसेवा महायुती सरकार हे सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे सरकार आहे. ते पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केले. कुर्ला पूर्व आणि अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या दोन प्रचारसभांत ते बोलत होते. अंधेरी पूर्वमध्ये भाजपचे मुरजी पटेल विरुद्ध ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके असा सामना असून कुर्ला राखीव मतदारसंघात ठाकरे गटाच्या प्रविणा मोरजकर यांनी आ. मंगेश कुडाळकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
इथूनच मुख्यमंत्र्यांच्या सभा सुरू झाल्या. रात्री बोरिवलीतदेखील मुख्यमंत्र्यांची सभा झाली. या सभांना शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कुर्ला मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी बौद्ध विहारात जाऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मंचावर येताच लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली. महायुती सरकार हे सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे सरकार असल्यानेच महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींसाठी लेक लाडकी लखपती योजना, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, मुलींना मोफत शिक्षण मिळावे यासाठी उच्च शिक्षण मोफत देणारी योजना, जे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना अशा अनेक योजना सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमचे सरकार हे देणारे सरकार असून आधीचे सरकार हे फक्त घेणारे सरकार होते, असेही ते म्हणाले. मुंबईत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, शहरातील रस्ते खड्डेमुक्त केले, मुंबईत ठिकठिकाणी डीप क्लीन ड्राइव्ह मोहीम राबवली, कोस्टल रोड, एमटीएचएल आणि मेट्रोद्वारे मुंबईकरांचा प्रवास गतिमान आणि सुखकर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.