उद्धव ठाकरेंचे यश ही तात्पुरती सूज : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरेंचे उमेदवार कसे निवडून आले, हे प्रत्येकाला माहीत आहे. त्यांचे यश ही तात्पुरती आलेली सूज आहे. शिवसेनेचा मूळ आधार आणि मतदार या परिस्थितीतही अन्यत्र गेला नाही. तो धनुष्यबाणाकडे वळला, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाचा समाचार घेतला.
शिवसेनेचा वर्धापनदिन बुधवारी वरळी डोम येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा स्ट्राईक रेट 42 टक्के आणि आपल्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट 47 टक्के आहे. त्यांच्यापेक्षा आमची कामगिरी सरस आहे. कारण, ही खर्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना आहे. धनुष्यबाणाची शिवसेना बिनतोड ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही जनतेने ट्रेलर दाखवला होता. महायुतीने सर्वात जास्त ग्रामपंचायतींवर विजय मिळवला होता. त्यामुळे खरी शिवसेना आणि नकली शिवसेना कोणती, हे जनतेने ठरवले आहे. वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा आमचाच आहे.
ठाकरेंनी पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला
जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी घेतलेला निर्णय योग्य होता. बाळासाहेबांचा फोटो लावून मते मागण्याचा नैतिक अधिकारही उद्धव ठाकरे यांना राहिलेला नाही. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना पाहून मला लाज वाटू लागली. शिवसेना आणि धनुष्यबाण पेलण्याची हिंमत मनगटात लागते. मात्र, मतांसाठी ठाकरेंनी बाळासाहेबांच्या मतांना तिलांजली दिली, अशी टीका त्यांनी केली.
कोकण आणि मराठवाडा हे शिवसेनेचे बालेकिल्ले लोकसभा निवडणुकीतही अबाधित राहिले. अनेकजण म्हणत होते आपण या बालेकिल्ल्यात पडणार. मात्र, आम्ही या सर्व जागांवर विजय मिळवला. आम्ही हा विजय घासून-पुसून नाही तर ठासून विजय मिळवला आहे, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
जे धाडस कुणी केले नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले आहे. एकनाथ शिंदे, आनंद दिघे हे बाळासाहेब यांचे सच्चे शिवसैनिक आहेत. ठाण्यात आमच्या जागा येणार नाही, असे अनेकजण म्हणत होते. परंतु ठाणे हा आनंद दिघे आणि शिंदेंचा अभेद्य गड आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.