

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यात कैद झाली होती. आजही या वाड्याचे अवशेष आहेत. हा वाडा अधिग्रहित करून तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधीमंडळात याबाबतची घोषणा केली.
छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे वास्तव्य असलेले ठिकाण म्हणजे संगमेश्वरातील सरदेसाई वाडा. छावा चित्रपटानंतर सरदेसाई वाडा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. त्यामुळे राज्यसरकाने संगमेश्वरातील ऐतिहासिक सरदेसाई वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी छत्रपती संभाजी महाराज जिथे शेवटच्या क्षणी होते त्या सरदेसाई वाड्याच्या ठिकाणी सरकारने स्मारक तयार करावे, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ' संगमेश्वरातील सरदेसाई वाडा अधिग्रहित करून तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले जाईल. उचित आणि छत्रपती संभाजी महाराजांना साजेसे असे स्मारक उभारू', अशी घोषणा केली.
छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर त्यांना तेथून श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भुईकोट किल्ल्यात आणण्यात आले. काही दिवस त्यांना तेथे साखळदंडाने बंदिस्त करण्यात आले होते. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शौर्यस्थळ असलेल्या धर्मवीरगडावर शंभूभक्तांचा ओघ वाढू लागला आहे. धर्मवीरगडास पेडगावचा किल्ला किंवा बहादूरगड अशीही नावे आहेत. हा किल्ला श्रीगोंदा तालुक्यात असून भीमा नदीच्या काठावर वसलेला आहे. इ.स. १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकाळात या किल्ल्याचे बांधकाम झाले आहे