

मुंबई : चेंबूरच्या घाटले खारदेवनगर परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेला एसआरए प्रकल्प मार्गी लावून लाडक्या बहिणींना हक्काचे आणि मोठे घर देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. प्रभाग क्रमांक 153 मध्ये शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवार तन्वी तुषार काते यांच्या प्रचारफेरीदरम्यान ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, घाटले खारदेवनगर भागातील एसआरए प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. घाटकोपर रमाबाई कॉलनीतील 17 हजार घरांचा प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मार्गी लागला, त्याच धर्तीवर घाटले खारदेवनगरचा प्रकल्पही पूर्ण केला जाईल.
खारदेवनगरमधील सेवानिवृत्त पालिका कर्मचाऱ्यांच्या बैठ्या पत्रा चाळींच्या मालकीहक्काचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कर्मचाऱ्यांची रोखून ठेवलेली ग्रॅच्युइटी, पीएफ आणि पेन्शन मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
दरम्यान, उमेदवार तन्वी तुषार काते यांच्या प्रचारफेरीला विभागातील विविध समाजघटक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत आहे.