

मुंबई : आयुष्याची चार दशके चेंबूरमध्ये घालवलेल्या ललिता कृष्णमूर्ती (८८) यांचा १३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मात्र आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ रक्ताच्या नात्यातील कोणीही नव्हते. ज्या दोन मुलींना त्यांनी लहानाचे मोठे केले, त्या दोघीही मुंबईबाहेर राहत होत्या. त्यांच्या निधनाची बातमी मुलींपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र संपर्क होत नव्हता.
अशा परिस्थितीत इमारतीतील रहिवासी आणि काही मोजक्या नातेवाइकांनी माणुसकीचे नाते जपत दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. आता वृत्तपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून अखेर त्यांच्या दोन्ही मुलींशी संपर्क झाला असून पुढील धार्मिक विधी त्यांच्यामार्फत केले जाणार आहेत.
चेन्नई येथील मूळ रहिवासी असलेल्या ललिता कृष्णमूर्ती चेंबूरमधील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांच्या मुली मुंबईबाहेर वास्तव्यास असल्याने त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी इमारतीतील ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या नातेवाईक उषा लक्ष्मीनारायण यांनी स्वीकारली होती. ललिता यांची विचारपूस करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांच्या गरजांच्या वेळी मदतीला धावून जाणे, अशा माध्यमातून इमारतीतील रहिवाशांनी त्यांच्याशी माणुसकीचे नाते जपले होते.
मात्र, ललिता यांच्या निधनाने या नात्यांची खरी कसोटी लागली. त्यांचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराची जबाबदारी कोण पार पाडणार, असा प्रश्न निर्माण झाला. दोन्ही मुलींचा संपर्क होत नसल्याने इमारतीतील रहिवासी आणि नातेवाइकांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मृत्यू नैसर्गिक असला, तरी कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रहिवाशांनी टिळकनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.
पोलिसांकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अंत्यसंस्कारासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्यानंतर रहिवासी आणि मोजक्या नातेवाइकांनी ललिता यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. दरम्यान, ललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलींपर्यंत माहिती पोहोचावी आणि पुढील संपर्क साधता यावा, यासाठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
ही जाहिरात समाजमाध्यमांवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. अनेकांनी या घटनेची दखल घेतली. अखेर या जाहिरातीच्या माध्यमातून ललिता यांच्या दोन्ही मुलींशी संपर्क साधण्यात यश आले आहे.
नाती जपणारी माणसेही आयुष्याचा महत्त्वाचा भाग
एका ज्येष्ठ महिलेच्या आयुष्याच्या अखेरच्या प्रवासात शेजाऱ्यांनी दिलेला आधार आणि दाखवलेली संवेदनशीलता ही अंत्यसंस्कारापुरती मर्यादित घटना नाही. धकाधकीत माणसे एकमेकांपासून दूर जात असताना, चेंबूरमधील रहिवाशांनी मात्र माणुसकीचा हात पुढे केला. नाती केवळ रक्ताचीच असतात असे नाही, तर ती जपणारी माणसेही आपल्या आयुष्याचा भाग असतात, याची जाणीव या घटनेने करून दिली.