

पुढारी ऑनलाईन डेस्क: Chandrashekhar Bawankule | बांगलादेशमधील हिंदू अत्याचारविरोधात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी 'आता भाजपचं हिंदुत्त्व आता काय करतंय...'? की केवळ मतांपुरतंच भाजपचे हिंदुत्त्व होतं का?, असा सवाल करत पंतप्रधान मोदींनी बांगलादेशवर ठोस भूमिका घ्यावी असे मत व्यक्त केले. यावर 'तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली', असे जोरदार प्रत्त्युत्तर भाजपने ठाकरेंना दिले आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे. बावनकुळे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे , "ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली".
"भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले. काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा उद्दामपणा काही काँग्रेस नेत्यांनी केला, पण तुम्ही अवाक्षर काढले नाही, यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते", असे जोरदार प्रत्युत्तर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. पालघरमध्ये झालेले साधूंचे हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली.बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं 'नागरिकत्व दुरूस्ती विधेयक' मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सुरूच आहेत. यावर भाजपकडून कोणतेही भाष्य केले जात नाही. भाजपचं हिंदुत्त्व केवळ मतांपुरतं मर्यादेत आहे का?, भाजपचं हिंदुत्त्व आता काय करत आहे?, इथे केवळ बटेंगे तो कटेंगे असे म्हणून काही उपयोग नाही. बांगला देशात हिंदुंची हत्या केली जात आहे, तर आता तुम्ही काय करणार? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. मातोश्रीवर आज (दि.१३) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे ठाकरे म्हणाले की, "बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचारावरील चर्चेसाठी आमच्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली होती. परंतु पंतप्रधान मोदींनी आमच्या खासदारांना वेळ नाकारली. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी बांगलादेशबाबत काय ठोस भूमिका घेणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.