

CET 2025 PCM group
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या पीसीएम गटातील गणित विषयाच्या ऑनलाईन प्रश्नपत्रिकेत प्रश्नांचे पर्याय बदलल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. यामुळे तब्बल २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे.
अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी पीसीएम आणि पीसीबी या दोन गटांमध्ये एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात येते. पीसीबी गटाची परीक्षा यंदा सुरळीत पार पडली मात्र पीसीएम गटाच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच २७ एप्रिल रोजी झालेल्या एका सत्रातील गणिताच्या पेपरमधील ५० पैकी २१ प्रश्नांसाठी दिलेल्या उत्तरांचे पर्याय चुकीचे देण्यात आले. इंग्रजी, मराठी आणि उर्द या तीन भाषांमध्ये होत असलेल्या या परीक्षेतील मराठी भाषेतील पेपर इंग्रजी भाषांतरित करताना प्रश्नांच्या पर्यायांची अदलाबदल झाल्याने हा गोंधळ झाल्याची कबुली सीईटी कक्षाने दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विद्यार्थ्यांनी तक्रारी व निवेदन दिली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर ऑनलाईन पेपरमधील ही तांत्रिक चूक असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा यासाठी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबत संबंधित दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.
परीक्षा देऊन गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. जे विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर मुंबई, ठाणे व पुण्यातून आपापल्या गावी गेले आहेत. त्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी यावे लागणार आहे. त्यांचा प्रवास खर्च आणि होणाऱ्या मानसिक त्रासाचे काय? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे
सदर परीक्षा सर्वच १५० प्रश्नांसाठी होणार असून फेरपरीक्षा ५ मे रोजी होणार असल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले. याबाबत विद्यार्थ्यांना एसएमएस, ई-मेलद्वारे कळवले जाईल. तसेच त्यांना नवी प्रवेशपत्रे दिली जातील. आधीच्या परीक्षेसाठी त्यांनी दिलेल्या केंद्राच्या पर्यायानुसार त्यांना परीक्षा केंद्रे दिली जातील, असेही आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले.