

मुंबई: मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वेमार्गिका उभारणीच्या कामांतर्गत सायन रोड ओव्हर ब्रिजच्या (कल्याण बाजू) गर्डर लाँचिंगसाठी माटुंगा ते कुर्ला स्थानक दरम्यान रात्रकालीन विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक १७ आणि १८ जून ते २४ आणि २५ जून २०२६ दरम्यान दररोज मध्यरात्री २ ते ४ तासांच्या कालावधीत विविध वेळांमध्ये राहणार आहे.
ब्लॉक कालावधीत माटुंगा- कुर्ला दरम्यान सर्व मार्गिकांवरील रेल्वे वाहतूक बंद राहणार असून, कुर्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध राहणार नसल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
१८ जून रोजी काही लोकल रद्द
१७ व १८ जूनच्या ब्लॉकदरम्यान १८ जून रोजी पहाटे १२.२४ वाजता सीएसएमटीहून सुटणारी सीएसएमटी ते ठाणे लोकल आणि पहाटे ४.०४ वाजता ठाण्याहून सुटणारी ठाणे ते सीएसएमटी लोकल रद्द राहणार आहे.
१९ जून रोजी अतिरिक्त परिणाम
१८/१९ जूनच्या ब्लॉकदरम्यान १९ जून रोजी १२.२४ वाजताची सीएसएमटी ते ठाणे लोकल रद्द राहील. १८ जून रोजी सुटणाऱ्या बदलापूर ते परेल, खोपोली ते परेल आणि बदलापूर ते सीएसएमटी लोकल कुर्ला स्थानकातच थांबतील. १८ जून रोजी रात्री ११.४० वा.ठाण्याहून सुटणारी ठाणे ते कुर्ला लोकल सीएसएमटीपर्यंत चालविण्यात येईल.