

मुंबई/कांदिवली : महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात 12 हजार पगारावर गेली सहा वर्षे 55 सफाई कामगार काम करीत आहेत. मात्र ठेकेदाराकडून आर्थिक पिळवणूक होत आहे. दिवाळीत ना पगार मिळाला, ना बोनस, त्यामुळे या कामगारांनी काम बंद केले आहे. शुक्रवारी या आंदोलनाचा दहावा दिवस होता. यामुळे रुग्णालयातील सफाईचे तीनतेरा वाजले आहेत. शौचालये, परिसर आणि वॉर्डात दुर्गंधी पसरली आहे.
तीन वर्षांपासून या कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही, दिवाळीत बोनसही दिला नाही, पगारात एक रुपयाही वाढ होत नाही. पीएफ आणि ईएसआयची रक्कम भरली जात नाही, आदी अनेक तक्रारी या कामगारांच्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी काम बंद केले आहे.
आमदार संजय उपाध्याय यांनी गुरुवारी कामगारांसह रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी अजय गुप्ता यांच्याशी चर्चा केली. या वेळी डॉ. अजय गुप्ता, भाजपा मुंबई सचिव शिवानंद शेट्टी, संयोजक दिनेश झाला, मंडळ अध्यक्ष नैनेश शाह, महामंत्री व्यंकटेश क्यासाराम, आणि वॉर्ड अध्यक्ष धर्मवीर ठाकूर उपस्थित होते.
डिसेंबरला कंत्राट संपणार
कल्पतरू संस्थतर्फे सफाईचे काम केले जात असून 30 डिसेंबर रोजी कंत्राटची मुदत संपणार आहे. यामुळे दिवाळी 5 हजार बोनस लवकरात लवकर द्यावेत यासाठी कामगार आक्रमक झाले आहेत. परंतु डिसेंबरला कंत्राट संपणार असल्याने मी बोनस का देऊ? असा पवित्रा कंत्राटदाराने घेतल्याने सफाई कामगारांनी 10 दिवसांपासून काम बंद ठेवले आहे.
2013 पासून मी काम करत आहे. पंधरा हजार पगार सांगितला, मात्र बारा हजारच दिला. तोही वेळेवर दिला जात नाही. पगारवाढही दिली गेेली नाही. आम्ही गरीब असल्याने 12 हजारात घर चालवणे मुश्कील होत आहे. शासनाच्या कामगार नियमानुसार आम्हाला सर्व फायदे मिळायला पाहिजेत, हीच आमची मागणी आहे.
वनिता हळदे, महिला कामगार