

Param Bir Singh News
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना सीबीआयकडून (CBI) क्लीन चिट मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकारी यांच्यावर ५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोपरी आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात परमबीर यांच्यावर २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, ही प्रकरणे पुढील तपासासाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात आली होती. मात्र तक्रारीच्या अनुषंगाने तपासात तथ्य न आढळल्याने सीबीआयने न्यायालयात दोन्ही गुन्ह्यासंदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. हा रिपोर्ट संबंधित न्यायालयाने स्वीकारला आहे.
परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणी आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. हे गुन्हे कोपरी, बाजारपेठ, मरीन ड्राइव्ह, गोरेगाव आणि ठाणे शहर पोलिस ठाण्यात दाखल केले होते. यातील कोपरी आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
परमबीर सिंह यांच्याविरुद्ध २३ जुलै २०२१ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. परमबीर यांच्यावर शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी उकळल्याचा आणि २ कोटी ६८ लाखाची जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी तक्रारदार शरद अग्रवाल यांच्या फिर्यादीनुसार, परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना सिंग आणि तत्कालीन डीसीपी पराग मनेरे यांनी मोक्काच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २ कोटींची रोख खंडणी वसूल केल्याचा आरोप केला होता.
बाजारपेठ पोलिस स्थानकात दाखल झालेल्या प्रकरणात एकूण ३३ जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यात काही पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकांचा समावेश होता. या दोन्ही प्रकरणांचा तपास सीबीआयने केला होता. या तपासादरम्यान तक्रारदाराच्या जबाबांच्या आधारे, सीबीआयने कोपरी आणि बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल झालेल्या प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. न्यायालयाने हा रिपोर्ट स्वीकारत खटला बंद केला.