

Sanjay Shirsat clarification income tax notice
मुंबई: विधानसभा निवडणुकीत मी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही तफावत वाटत असल्याने मला आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्या नोटीसला मी उत्तर देणार आहे, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, याच वेळी काही पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनादेखील नोटीस आली आहे का? असे विचारले असता याबाबत मला कोणतीही माहिती नाही, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
मंत्री शिरसाट म्हणाले की, मला आयकर विभागाची नोटीस आली आहे, हे खरं आहे. पण मला काही पत्रकारांनी विचारले की खासदार श्रीकांत शिंदेंनासुद्धा नोटीस आली आहे का? यावर मी याबाबत मला काहीही माहीत नाही, असे सांगितले. पण श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचे माझ्या तोंडी घालण्यात आल्याचे शिरसाट यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिल्ली गाठून काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यात मंत्री शिरसाट यांनी माझ्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे माध्यमांशी बोलताना गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
पण यावर शिरसाट यांनी खुलासा करताना केवल मला आयकर विभागाची नोटीस आली असून श्रीकांत शिंदेंना नोटीस आल्याचे मला माहित नाही, असे स्पष्ट केले. आयकर विभागाची प्रत्येकाची चौकशी करू शकतो, मलाही नोटीस आली आहे. या नोटीशीवर ९ जुलैरोजी उत्तर देण्यास मला सांगण्यात आले होते. परंतु, मी नोटीसला उत्तर देणार आहे. त्यासाठी मी आयकर विभागाकडे उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मागितली आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.