

मुंबई: मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरा देणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांच्या २० वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. माफीच्या साक्षीदाराने वारंवार जबानी बदलल्याने न्यायालयाने आरोपींची निर्दोष सुटका केली.
विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी हा निर्णय देताना माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीतील विसंगती आणि तपास यंत्रणेच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी मुख्य आरोपी असलेले ८६ वर्षीय पद्मसिंह पाटील यांना व्हीलचेअरवरून न्यायालयात आणले होते.
ते शनिवारी कोर्टरूममध्ये उपस्थित होते. हा निर्णय सरकारी पक्ष तसेच पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव असलेले शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. ओमराजे निंबाळकर यांनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.
निंबाळकर कुटुंबाने या हत्येमागे राजकीय वैमनस्यातून पद्मसिंह पाटील यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. तथापि, सबळ पुराव्याअभावी सरकारी पक्ष हत्या व हत्येचा कट रचणे यांसारखे गंभीर आरोप सिद्ध करू शकला नाही. याची नोंद घेत सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे एकमेकांचे राजकीय विरोधक होते आणि त्यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या, हे सिद्ध झाले आहे. मात्र, हत्येसारखा गंभीर आरोप सिद्ध करण्यात सीबीआय आणि सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली. त्यांनी सरकारी पक्षाच्या पुराव्यांतील त्रुटींकडे लक्ष वेधले. त्याची दखल घेत न्यायालयाने निकाल दिला.
सुमारे २० वर्षे चाललेल्या या खटल्यात १२८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाही समावेश होता. हत्येची सुपारी स्वीकारल्याचा आरोप असलेला पारसमल जैन नंतर माफीचा साक्षीदार झाला.
हत्येच्या दोन वर्षांपूर्वी, २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांनी तत्कालीन उस्मानाबाद मतदारसंघातून पवनराजे निंबाळकर यांचा अवघ्या ४८४ मतांच्या निसटत्या फरकाने पराभव केला होता. तथापि, पवनराजे यांच्या वाढत्या प्रभावामुळे आपल्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण होईल, या भीतीने पाटील यांनी त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप सीबीआयने केला होता.
डॉ. पद्मसिंह पाटील व (कै.) पवनराजे निंबाळकर हे दोघेही सख्खे चुलत बंधू. या दोघांच्याही आजोबांचे नाव भूपालसिंह राजेनिंबाळकर.
पवनराजेंच्या वडिलांचे नाव संताजीराव तर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वडिलांचे नाव बाजीराव. बाजीराव हे तेरचे पाटील भगवंतराव पाटील यांच्या घरात दत्तक गेले. त्यामुळे डॉ. पद्मसिंह यांचे आडनाव पाटील आहे. वेगवेगळे आडनाव असले तरी सख्खे चुलत बंधूंच्या घराण्यातील हा राजकीय संघर्ष रक्तरंजित बनला.
सीबीआय आव्हान देणार
या निकालाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले असल्याने या निकालाविरोधात अपील केले जाईल, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.
तत्पूर्वी कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. त्यानंतर या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याचे आणि भक्कमपणे बाजू मांडण्याचे आदेश शहा यांनी सीबीआयला दिले.
खटल्याचा घटनाक्रम
३ जून २००६ : पवनराजे निंबाळकर व चालक समद काझी यांची कळंबोली (नवी मुंबई) येथे गोळ्या झाडून हत्या.
जून २००६ : महाराष्ट्र पोलिसांकडून गुन्हा नोंद; तपास सुरू.
२००७-२००८ : प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग.
२००९ : सीबीआयने कथित कट, सुपारी व संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
२०१०-२०११ : प्रमुख आरोपींविरुद्ध आरोप निश्चित; नियमित सुनावणी सुरू.
२०११-२०२५ : विविध साक्षीदारांच्या साक्षी, पुरावे, उलटतपासणी आणि न्यायालयीन प्रक्रिया.
मे-जून २०२६ : अंतिम युक्तिवाद पूर्ण; निकाल राखून ठेवला.
१६ जून २०२६ : मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयाने निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
३ जून २००६ : काय घडलं त्या दिवशी?
पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी हे पांढऱ्या स्कोडा कारने प्रवास करत होते. ते कळंबोलीमार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या दिशेने जात होते.
हल्लेखोर एका टाटा इंडिका कारमधून त्यांचा पाठलाग करत होते. इंडिकाने आधी स्कोडाचा पाठलाग केला. नंतर पुढे जाऊन ओव्हरटेक करीत कळंबोलीतील एका रस्त्यावर इंडिकाने स्कोडाचा मार्ग रोखला.
पवनराजेंची कार थांबताच इंडिकामधील एक व्यक्ती स्कोडाजवळ आली आणि चालकाला काच खाली करण्यास सांगितले.
कारची काच खाली होताच हल्लेखोराने जवळून गोळीबार केला. पवनराजेंवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. चालक समद काझींनाही लक्ष्य करण्यात आले.
गोळीबारानंतर हल्लेखोर इंडिकामध्ये बसले व घटनास्थळावरून पळून गेले.
पोलिसांना ९ एम.एम. पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांचे पुरावे मिळाले होते. पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुहेरी हत्येमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.
शूटरकडून हत्या
सीबीआयने सुरुवातीला शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशिकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन यांना अटक केली तर २००९ मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती.
माफीच्या साक्षीदाराच्या जबाबात विसंगती
पद्मसिंह पाटील आणि इतर दोघांनी मिळून पवनराजे यांच्या हत्येचा कट रचला. यासाठी पारसमल जैन नावाच्या व्यक्तीला सुपारी देण्यात आली. त्याने तीन शूटर्स आणि इतर साहित्याची व्यवस्था केली. पारसमल जैन नंतर या प्रकरणात ‘माफीचा साक्षीदार’ बनला होता. तथापि, माफीचा साक्षीदार म्हणून पारसमलने दिलेल्या जबानीत गंभीर विसंगती आढळली. त्याने वारंवार जबान्या फिरवल्या आहेत. अशा परिस्थितीत केवळ त्याची जबानी ग्राह्य धरत आरोपींना दोषी ठरवता येणार नाही, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले.
निर्दोष नऊ
१. पद्मसिंह पाटील
२. दिनेश तिवारी
३. पिंटू सिंग
४. छोटू पांडे
५. मोहन शुक्ला
६. कैलास यादव
७. शशिकांत कुलकर्णी
८. सतीश मंदाडे
९. पारसमल जै