Banking recruitment scam : बँक भरती परीक्षेत देशव्यापी बोगस उमेदवार

रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश : सीजीएसटी निरीक्षकासह चौघांना अटक; मुंबईच्या स्पेशल टास्क ब्रँचकडून चार राज्यांत छापेमारी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : बँकिंग क्षेत्रातील भरती परीक्षांमध्ये पात्र उमेदवारांच्या जागी दुसऱ्यांनाच परीक्षेला आणि मुलाखतीला बसवून निवड प्रक्रिया हायजॅक करणाऱ्या देशव्यापी रॅकेटचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सीबीआयने सीजीएसटीच्या एका निरीक्षकासह चौघांना अटक केली आहे. दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये हे रॅकेट कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या देशव्यापी कारवाईचे नेतृत्व सीबीआयच्या मुंबईतील स्पेशल टास्क ब्रँचकडून करण्यात आले.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)च्या तक्रारीवरून सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंबईतील स्पेशल टास्क ब्रँचने चार राज्यांत समन्वयाने छापेमारी करून चौघांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये सीजीएसटी निरीक्षकाचाही समावेश आहे. या कारवाईमुळे बँकिंग भरती प्रक्रियेत सुरू असलेल्या संघटित गैरप्रकाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

Crime News
MPSC Chairman Vivek Bhimanwar: एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन तीव्र; उद्धव ठाकरेंचे विद्यार्थ्यांना २४ तासांचे आवाहन

उमेदवारांच्या जागी ‘बोगस’ व्यक्ती

सीबीआयच्या तपासानुसार, संबंधित टोळी भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष उमेदवार असल्याचे भासवून सहभागी होत होती. लेखी परीक्षा तसेच मुलाखतीच्या वेळी मूळ उमेदवाराच्या जागी दुसरी व्यक्ती बसविण्याचा प्रकार केला जात होता. या माध्यमातून पात्रतेचे निकष आणि निवड प्रक्रिया डावलून इच्छित उमेदवारांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे.

सीबीआयने या प्रकरणातील कारवाई दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालपर्यंत विस्तारली. विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत रॅकेटशी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यात आला. मात्र, महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र किंवा मुंबईतील एखादा उमेदवार या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे सध्या तपासातून समोर आलेले नाही. महाराष्ट्राचे कनेक्शन सध्या मुख्यतः सीबीआयच्या मुंबईस्थित स्पेशल टास्क ब्रँचकडून करण्यात आलेल्या कारवाईपुरते असल्याचे उपलब्ध माहितीतून स्पष्ट होते.

Crime News
MPSC Protest Pune: एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाही; जागा सोडण्याच्या पोलिसांच्या सूचना

इतर आरोपींचा शोध सुरू

या गैरप्रकारामुळे सार्वजनिक परीक्षांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेहनत करून परीक्षा देणाऱ्या पात्र उमेदवारांच्या संधीवरही या रॅकेटमुळे परिणाम होत असल्याचे सीबीआयने नमूद केले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच बनावट उमेदवार पुरविण्याचे जाळे किती व्यापक आहे, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासण्यासाठी सीबीआयचा तपास सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news