

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत भारताच्या सर्वात मोठ्या टनेल बोअरिंग मशिनने रविवारी विक्रोळी शाफ्टमधून (बोगद्याच्या सुरुवातीचा खोल खड्डा) खोदकामास सुरुवात केली. एकूण २१ कि.मी. लांबीच्या भुयारी बोगद्याच्या भागापैकी मुंबईतील सावळी (घणसोली) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सदरम्यानचा १६ किमीचा टप्पा टनेल बोअरिंग मशिनचा वापर करून तयार केला जाईल; तर उर्वरित ५ कि.मी.चा टप्पा एनएटीएम तंत्रज्ञानाचा वापर करून आधीच पूर्ण झाला आहे.
विक्रोळी येथून सुरू झालेले हे टीबीएम मशिन ६ किमी लांबीचा सिंगल ट्यूब बोगदा तयार करणार आहे, जो हाय स्पीड रेल कॉरिडॉरच्या ‘अप’ आणि ‘डाऊन’ अशा दोन्ही ट्रॅक सामावून घेण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. या प्रवासादरम्यान हे मशिन बहुमजली इमारती, प्रमुख रस्ते, मिठी नदी आणि इतर महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या खालून बोगदा तयार करणार आहे, त्यासाठी उच्च अचूकता आणि सतत देखरेखीची आवश्यकता असेल.
भारतातील रेल्वे बोगदा बांधकामासाठी आतापर्यंत वापरण्यात आलेले हे सर्वात मोठे टीबीएम असून, यात चार मजली इमारतीच्या उंचीइतका म्हणजे १३.६ मीटर व्यासाचा कटरहेड आहे. या मशिनचे वजन सुमारे ३,१०० टन (५०० आशियाई हत्तींच्या वजनाइतके) असून त्याची लांबी ९६ मीटर आहे.
यामध्ये कटर व्हील, मेन बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मेन आणि टेल शिल्ड्स यांसारख्या प्रमुख घटकांसह बोगदा खोदण्याच्या कामाला मदत करणाऱ्या चार विशेष गॅन्ट्रीजचा समावेश आहे. याचे कटरहेड प्रति मिनिट चार फेऱ्या या वेगाने फिरते. हे मशिन एक ‘मिक्सशिल्ड टीबीएम’ आहे, ती मिश्र भौगोलिक परिस्थिती आणि जमिनीखालील पाण्याचा जास्त दाब असलेल्या भागात मोठ्या व्यासाच्या खोदकामासाठी विशेषतः डिझाईन केलेली एक प्रगत टनेलिंग प्रणाली आहे.
टीबीएम सुरू करणे सुलभ व्हावे म्हणून मुंबईतील विक्रोळी येथे जमिनीखाली २० मजली इमारतीइतका म्हणजेच ५६ मीटर खोल शाफ्ट तयार करण्यात आला आहे. सुरक्षितपणे बोगदा खोदण्यासाठी आणि जवळील वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी एक व्यापक रिअल टाईम देखरेख (मॉनिटरिंग) यंत्रणा बसवण्यात आली आहे.
बांधकाम सुरक्षेवर लक्ष
टीबीएम वापरून खोदण्यात येणारा बोगद्याचा भाग पूर्णपणे वॉटरप्रूफ (पाणी न झरणारी) रचना म्हणून डिझाईन केला जात आहे. वास्तूंची स्थिती, भूगर्भातील पाण्याची पातळी आणि एकंदरीत बांधकाम सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी सतत चालणारी रिअल टाईम मॉनिटरिंग सिस्टीमही बसवण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पासाठी हा एक मोठा मैलाचा दगड ठरला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, या प्रकल्पातील सुरत-बिलीमोरादरम्यानचा टप्पा ऑगस्ट २०२७ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.