

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर आज सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) पोहोचले. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानाकडे (ताज महल पॅलेस) रवाना झाले.
ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथींदरम्यान भारत-ब्रिटन भागीदारीच्या एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी ब्रिटिश पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची मुंबईत भेट घेऊन दोन्ही देशांच्या 'व्हिजन २०२५' या वेळेनुसार आखलेल्या कार्यक्रमावर चर्चा करतील.
स्टार्मर आज आणि उद्या त्यांच्या पहिल्या दोन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी सकाळी मुंबईतील राजभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही पंतप्रधान 'व्हिजन २०२५' नुसार भारत-ब्रिटन व्यापक सामरिक भागीदारीवर चर्चा करणार आहेत.
ब्रिटिश पंतप्रधान स्टार्मर मुंबईतील एका हिंदी चित्रपट स्टुडिओला आणि एका फुटबॉल सामन्यालाही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था गेटवे ऑफ इंडिया समोर असलेल्या हॉटेल ताज महल पॅलेस मध्ये केली आहे. दुपारपर्यंत हॉटेलमध्ये विश्राम केल्यानंतर स्टार्मर मुंबईतील उपनगर अंधेरी येथील यशराज स्टुडिओ ला भेट देतील. या स्टुडिओची स्थापना चित्रपट निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांनी १९७० मध्ये केली होती. स्टार्मर यशराज स्टुडिओमध्ये सुमारे एक तास थांबतील. त्यानंतर ते पुन्हा दक्षिण मुंबईकडे जातील आणि दुपारी २.४५ वाजता मंत्रालयाच्या जवळ असलेल्या कूपरेज फुटबॉल ग्राउंड येथे प्रीमियर लीग फुटबॉल पाहण्यासाठी पोहोचणार आहेत.