

मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाला ‘सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. १०) लोकार्पण झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "अनेक वर्षे जुना असलेल्या कर्नाक हा पूल आपण वापरत होतो. इंग्रजी गव्हर्नरच्या नावाववरून हा पूल बांधण्यात आला होता. स्वकियांवर अत्याचार करणारा कर्नाकच्या नावाने हा पूल होता. या काळ्या इतिहासाची पाने पुसली पाहिजेत, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती. इतिहासातील काळ्या खुणा पुसण्याचा भाग म्हणूनच या पुलाचे नामांतरण करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याची अतुलनिय शौर्य गाजवले. त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठीच या पुलाचे सिंदूर नामांतरण करण्यात आले आहे."
मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळ असलेला हा पूल पी. डि'मेलो मार्गाला थेट मोहम्मद अली रोडशी जोडतो. दीडशे वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन कर्नाक पूल धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला होता. तेव्हापासून या मार्गावरील वाहतुकीवर मोठा ताण येत होता. आता या नव्या सिंदूर पुलामुळे दक्षिण मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरे थेट जोडली जातील, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल. सीएसएमटी, भायखळा आणि डॉकयार्ड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. तसेच दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार आणि नागरिकांना एक वेगवान आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.
भारतीय सैन्याने दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्याची ताकद जगाला दाखवून दिली आहे. पहलगाम हल्ल्याचे उत्तर ऑपरेशन सिंदूर करुन नव्या भारताच्या हिंमतीची जाणीव करुन दिली. भारतीय सैन्याच्या या ऑपरेशनवरुन अनेकांनी त्या काळामध्ये जन्मलेल्या आपल्या मुलांची नावे देखील हटके ठेवली आहेत. आता भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून मुंबईतील कर्नाक पुलाला सिंदूर असे नाव देण्यात येणार आहे.
आय.आय.टी. मुंबईच्या संरचनात्मक परिक्षणाच्या आधारे मध्य रेल्वे प्रशासनाने कर्नाक पूल धोकादायक ठरवून सन २०१४ मध्ये जड वाहनांसाठी निर्बंधित केला. तर, सन २०२२ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला. मध्य रेल्वेमार्फत नोव्हेंबर २०२२ मध्ये पुलाचे निष्कासन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्यामार्फत 'सिंदूर पूल' प्रकल्प राबविण्यात आला आहे. कामाची गुणवत्ता व दर्जा राखण्यासाठी रेल्वे हद्दीतील काम, मेसर्स राईट्स लिमिटेड (RITES Ltd.) यांच्या पर्यवेक्षणात करण्यात आले आहे.
पुलाचे मोजमाप
संपूर्ण पूलाची (प्रकल्पाची) लांबी ३४२ मीटर
लोहमार्गावरील पूलः आर.सी.सी. आधारस्तंभांवर (पीअर) प्रत्येकी ५०७ मे. टन वजनाचे, ७० मीटर लांबी, रुंदी २६.५० मीटर व १०.८ मीटर उंचीचे दोन गर्डर, आर.सी.सी. डेक स्लॅब, डांबरीकरण इत्यादी.
महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्ते लांबी २३० मीटर (पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर), आर.सी.सी. डेक स्लॅब, डांबरीकरण इत्यादी.
प्रकल्पाचा खर्च :
(१) लोहमार्गावरील पूल रु. ५३.०५ कोटी.
(२) महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्ते रु. ४४.८० कोटी.
(३) प्रकल्पाचा एकूण खर्च रु. ९७.८५ कोटी..
प्रकल्पाचा कालावधी कार्यारंभः
रेल्वे हद्दीतील १५ डिसेंबर २०२२.
महानगरपालिका हद्दीतील पश्चिम बाजू १५ मार्च २०२४, पूर्व बाजू फेब्रुवारी २०२५.
पुलाच्या पुर्णत्वाचा दिनांक :१० जून २०२५.
सिंदूर पूलाच्या पुनर्बाधणीचे फायदे
मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डि' मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व पश्चिमेला-जोडणारा महत्त्वाचा दुवा.
सिंदूर पुलाच्या पुनर्बाधणीमुळे अनेक वर्षापासून बाधित झालेली पूर्व पश्चिम- वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार.
सिंदूर पूल कार्यान्वित झाल्यावर पी डि' मेलो मार्ग व पुढे शहीद भगतसिंग मार्गावरील विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदन बिंदूवरील (junction) वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.
सिंदूर पुलाच्या पुनर्बाधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार.
पोहोच रस्त्याचे काम १२ महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित. मात्र, संपूर्ण पोहोच रस्त्याचे काम ७ महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. पूर्वेकडील संपूर्ण काम पायाभरणीपासून ते डांबरीकरणापर्यंत है अवघ्या ४ महिन्यात पूर्ण झाले आहे. हे काम कमी वेळेत पूर्ण करणे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक, कौशल्याचे होते.