

मुंबई: आपल्या जिवंत पतीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून संयुक्त मालकीचा तब्बल १.११ कोटी रुपयांचा फ्लॅट परस्पर विकणाऱ्या एका ४९ वर्षीय महिलेला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे.
पतीला कागदपत्रांवर मृत दाखवून ही मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव शालिनी डायना क्रास्टा असे असून तिच्या ५१ वर्षीय पतीचे नाव रायन अॅपेलिन क्रास्टा आहे.
हॉटेल ताज (कुलाबा) येथे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करणाऱ्या रायन यांचा विवाह २००७ मध्ये शालिनीसोबत झाला होता. २०१६ मध्ये त्यांनी बोरिवलीतील एल. एम. रोडवरील राज व्हिला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ७३.८० लाख रुपयांचा १ बीएचके फ्लॅट संयुक्त नावावर खरेदी केला होता. त्यासाठी ५६ लाखांचे कर्ज घेतले असून रायन स्वतः त्याचे हप्ते भरत होते.
दरम्यान, कौटुंबिक वादानंतर दोघेही वेगळे राहू लागले. रायन वांद्रे येथे आईकडे राहण्यास गेले तर शालिनी बोरीवलीच्या फ्लॅटमध्ये राहत होती.
बनावट मृत्यू दाखला आणि विक्री
पती वेगळा राहात असल्याचा फायदा घेत शालिनीने रायन यांच्या नावे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. तसेच सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून बनावट ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) व स्वतःला कायदेशीर वारस दाखवणारे प्रतिज्ञापत्र तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तिने ११ एप्रिल २०२५ रोजी हा फ्लॅट धनेश तन्ना आणि धारा तन्ना यांना १.११ कोटी रुपयांना विकला.
भांडाफोड कसा झाला?
मे २०२६ मध्ये रायन यांचे मित्र प्रसाद पठाडे यांनी त्यांच्या फ्लॅटवर एका खासगी बँकेचे कर्ज काढण्यात आल्याची माहिती दिली. रायन यांनी बँकेत चौकशी केली असता फ्लॅटची विक्री झाल्याचे आणि कागदपत्रांमध्ये त्यांना मृत दाखवण्यात आल्याचे समजून त्यांना मोठा धक्का बसला. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीही असा कोणताही दाखला दिला नसल्याचे स्पष्ट केले.
रायन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर प्राथमिक चौकशीअंती बोरीवली पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी शालिनीला अटक केली. न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे. शालिनीला बनावट मृत्यू प्रमाणपत्र आणि एनओसी मिळवून देण्यास कोणी मदत केली तसेच १.११ कोटी रुपयांच्या रकमेचा वापर तिने कोठे केला, याचा तपास पोलिस करत आहेत.