

मुंबई : नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये मुंबईत 6 हजार 238 मालमत्तांची विक्री झाली. या व्यवहारांमुळे मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून 587 कोटींचा महसूल जमा झाला.
गृहविक्रीच्या दृष्टीने यावर्षीचा सप्टेंबर गेल्या दशकभरातील सर्वाधिक चांगला सप्टेंबर मानला जात आहे. यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये मुंबईत 12 हजार 70 मालमत्तांची विक्री झाली. यात सर्वाधिक प्रभाव नवरात्रोत्सवाचा आहे. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव होता, तर 2 ऑक्टोबरला दसरा होता. गेल्या वर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात 5 हजार 199 मालमत्तांची विक्री झाली होती. मात्र यावर्षी 6 हजार 238 मालमत्तांची विक्री झाली. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत 20 टक्के वाढ झाली. 2023 सालच्या नवरात्रोत्सवात 4 हजार 594 मालमत्तांची विक्री झाली होती.
यावर्षी 587 कोटींचा महसूल जमा झाला, जो गेल्या वर्षीपेक्षा 17 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात 502 कोटींचा महसूल जमा झाला होता. 2023 साली या उत्सवात 436 कोटींचा महसूल जमा झाला होता.