

BSE Bomb Threat
मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला मंगळवारी सकाळी एक धमकीचा ईमेल मिळाला. बीएसई टॉवर इमारतीत चार आरडीएक्स आईडी (RDX IED) बॉम्ब ठेवण्यात आले असून त्याचा दुपारी ३ वाजता स्फोट होईल, असा दावा धमकीच्या ईमेलमधून करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली.
दरम्यान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर याची माहिती तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब स्क्वॉड टीम आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण बीएसई इमारतीत काहीही संशयास्पद आढळून आले नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
कॉम्रेड पिनारायी विजयन नावाच्या ईमेल आयडीवरून हा धमकीचा ईमेल आला आहे. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(१)(बी), ३५३(२), ३५१(३), ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
सोमवारी अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. या प्रकरणी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) पोलिस तक्रार दाखल केली. दरम्यान, मंगळवारी द्वारका येथील सेंट थॉमस स्कूल आणि दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली.