

Palghar hospital staff assault Case
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : "हीच का तुमची कार्यक्षमता?, एफआयआर दाखल होताच ९ आरोपी पळून जातात कसे? जर तुमच्याने होत नसेल तर आम्ही तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करतो,"अशा शब्दांमध्ये पालघरमधील रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांची खरडपट्टी काढली. या घटनेविरोधात पालघर डॉक्टर्स असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पालघरच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती.
सुनावणी दरम्यान पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते. या प्रकरणातील १० आरोपींपैकी नऊ आरोपी फरार असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. "हीच तुमची कार्यक्षमता?" असा थेट सवाल उच्च न्यायालयाने पोलिसांना विचारला. तसेच, "एफआयआर दाखल होताच ९ आरोपी पळून जातात कसे? जर तुमच्याने होत नसेल तर आम्ही तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करतो," अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांना बजावले.
यासोबतच केस डायरी नियमित न ठेवल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांची कानउघडणी केली. "ही केस डायरी म्हणजे केवळ औपचारिकता आहे. अशी केस डायरी हे बीएनएसएस (BNSS) चे उल्लंघन आहेच, पण पोलीस महासंचालकांनी काढलेल्या आदेशाचे देखील उल्लंघन आहे," अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांना खडसावले.
दरम्यान, तपास अधिकाऱ्यावर कोणती प्रशासकीय कारवाई करणार याचे थेट पोलीस महासंचालकांकडून निर्देश घेण्याचे सूचना उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना दिल्या आहेत. या प्रकरणावर आज सायंकाळी पाच वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.