

पुढारी ऑनलाईन डेस्क: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. मुंबई हायकोर्टाना आज (दि.४) १ लाख रूपयांच्या मुचलक्यावर सूरज यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
राज्यातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणातील सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. ईडीकडून त्यांना १७ जानेवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. एका राजकीय नेत्याशी जवळीक असल्यानेच खिचडीच्या पुरवठ्यासाठी पालिकेकडून ऑर्डर मिळवण्यात चव्हाण यशस्वी झाले. पालिकेकडून ८.६४ कोटी रुपये खिचडी वाटपासाठी देण्यात आले. त्यातील ३.६४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला, त्यापैकी १.२५ कोटी हे सूरज चव्हाण यांच्या खात्यात आढळून आले. सूरज चव्हाण यांनी हे पैसे पगार व कर्जातून उभे केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. कोविडदरम्यान लॉकडाऊनच्या काळात खिचडी घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आरोप केले होते.
सूरज चव्हाण यांच्या जामीनावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले. सर्व काही मिळूनही, चोरासारखे पळून गेले, कृतघ्न झाले. ज्या उद्धवजींनी भरभरुन दिलं त्यांच्याच वडीलांचा फोटो, दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करुन निर्लज्जपणे मंत्रीपदं मिळवली, पापाचा अमाप पैसा साठवला. पण दुसऱ्या बाजूला मात्र, एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ... सूरज"!