

मुंबई : दोन वर्षांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात उघडकीस आलेल्या हत्येच्या गुन्ह्यात संशयावरून ताब्यात घेतलेल्या मूकबधिर महिलेला उच्च न्यायालयाने जामिनाचा दिलासा दिला. गेल्यावर्षी जामीन मिळूनही जामीनदार म्हणून कोणीही पुढे न आल्याने मूकबधिर महिला तुरुंगात खितपत पडली होती. अखेर 'दर्द से हमदर्द तक' संस्थेतर्फे अॅड. हिमांशू माने यांनी विनंती करताच न्या. श्याम चांडक यांनी महिलेला १० हजाराच्या जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.
४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री दादर रेल्वे स्थानकात प्रवासी तुतारी गाडीची प्रतीक्षा करीत होते. यावेळी एका प्रवाशाकडे संशयस्पद बॅग आढळली होती. त्या बॅगेची तपासणी केली असता आतमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. तो मृतदेह आरोपी मूकबधिर महिला रुकसाना शेखचा पती अरशद अली शेखचा असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करीत रुकसाना शेख व इतर दोघांना अटक केली होती.
अनैतिक विवाहबाह्य संबंधातून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात गेल्या वर्षी जूनमध्ये न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने आरोपी रुकसानाला जामीन मंजूर केला होता. त्यासाठी ५० हजार रुपयांचा जामीनदार देण्याची अट टाकली होती. परंतु महिलेच्या मागेपुढे कोणीही नसल्यामुळे 'दर्द से हमदर्द तक' संस्थेच्या वतीने तिचा जामीन विनामूल्य करण्यात आला होता. पण ती महिला जामिनाची अट पूर्ण करू शकली नाही.
त्या पार्श्वभूमीवर संस्थेतर्फे पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आणि मूकबधिर महिलेला वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याची विनंती अॅड. हिमांशू माने यांनी केली. त्यांचा युक्तिवाद स्वीकारत न्या. श्याम चांडक यांनी महिलेला १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.
आरोपी मूकबधिर महिला मागील दोन वर्षे तुरुंगात खितपत पडली आहे. तिला ७ व १३ वर्षांची दोन मुले आहेत. या सर्व वस्तुस्थितीचा न्यायमूर्ती चांडक यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला.