

मुंबई: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सोमवारी उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. इंटरनेटवर त्यांच्याविरुद्ध पसरवल्या जाणाऱ्या कथित डीपफेक मानहानीकारक मजकुराविरोधात दिवाणी खटला दाखल करण्यास न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या एकलपीठाने परवानगी दिली. गडकरी आता मेटा, गुगल, 'एक्स' या सोशल नेटवर्किंग साईटविरुद्ध कायदेशीर कारवाई करु शकणार आहेत.
केंद्र सरकारच्या 'इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम'शी आपली चुकीच्या पद्धतीने लिंक लावल्याचा दावा करीत गडकरी यांनी सोशल मीडियातील मजकुराकडे उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या नावाने सोशल मीडिया आणि इंटरनेटवर काही बनावट, डीपफेक व्हिडिओ आणि मानहानीकारक मजकूर प्रसारित केले जात असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला.
याच अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली. गडकरी यांच्या वतीने ॲड. संदीप लड्डा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. गडकरींनी प्रतिवादी मेटा, गुगल, एक्स या सोशल नेटवर्किंग साईट्सकडून ११ कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे.