

मुंबई: बॉम्बच्या धमकीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण विमानतळाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
गेल्याच आठवड्यात मुंबईसह पुणे व नागपूर येथे ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. तोवर शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मेल प्राप्त झाला. अज्ञात व्यक्तींनी ते एका दहशतवादी गटाचे सदस्य आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवला आहे.
या बॉम्बचा कुठल्याही क्षणी स्फोट होईल, त्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी आहे. आम्ही अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवले असून त्यापैकी एक बॉम्ब आंतराष्ट्रीय विमानतळावर ठेवला आहे. आम्ही कुठेही आणि कधीही हल्ला करू शकतो, तुम्हाला लवकरच आमच्या दशहतीची खरी ताकद समजेल, असे नमूद करण्यात आले होते.
या मेलनंतर विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकांच्या मदतीने संपूर्ण विमानतळासह आसपासच्या परिसराची कसून तपासणी केली होती. मात्र तिथे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघड झाले.या घटनेनंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.