पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan Gets Death Threat) याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने दोन कोटी रुपये देण्याची मागणी करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 'जर का पैसे दिले नाहीत, तर सलमान खानला ठार मारु', असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला होता. हा मेसेज मिळाल्यानंतर मुंबईच्या वरळी जिल्ह्यातील पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यातून २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात ३५४ (२), ३०८(४) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Death Threat To Salman Khan and Zeeshan Siddique) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काल मंगळवारी पोलिसांनी २० वर्षीय संशयित व्यक्तीला नोएडा येथून अटक केली होती. मोहम्मद तय्यब असे संशयिताचे नाव आहे. त्याने शुक्रवारी ( दि. २५ ऑक्टोबर) संध्याकाळी संशयिताने कॉलवरुन धमकी दिली होती. या प्रकरणी वांद्रे पूर्वचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
१२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर झिशान सिद्दीकी आणि सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मोहम्मद तय्यब उर्फ गुरफान याने जीवे मारण्याच्या धमकीसह झिशान सिद्दिकी आणि सलमान खान यांच्याकडे खंडणीचीही मागणी केली होती. २० वर्षीय तय्यब याला मंगळवारी सकाळी नोएडाच्या सेक्टर ३९ परिसरात अटक करण्यात आली.
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकवेळा सलमानला धमकी मिळाली होती. २०२२ मध्ये सलमानला धमकीचे पत्र त्याच्या निवासस्थानाजवळ सापडले होते. त्याला मार्च २०२३ मध्ये गोल्डी ब्रारने कथितपणे पाठवलेला ईमेलदेखील मिळाला. २०२४ मध्ये दोन अज्ञातांनी बनावट ओळखीचा वापर करुन पनवेलमधील सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता.