पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Death Threat To Salman Khan and Zeeshan Siddique) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकी मिळाली होती. या प्रकरणी आज पोलिसांनी २० वर्षीय संशयित व्यक्तीला नोएडा येथून अटक केली. मोहम्मद तय्यब असे संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी ( दि. २५ ऑक्टोबर) संध्याकाळी संशयिताने कॉलवरुन धमकी दिली होती. या प्रकरणी वांद्रे पूर्वचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
१२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर झिशान सिद्दीकी आणि सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मोहम्मद तय्यब उर्फ गुरफान याने झिशान सिद्दिकी आणि सलमान खान यांच्याकडेही खंडणीचीही मागणी केली होती. २० वर्षीय तय्यब याला मंगळवारी सकाळी नोएडाच्या सेक्टर ३९ परिसरात अटक करण्यात आली. त्याला मुंबई पोलीस ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जात आहे.
वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील फोनवर धमकीचा फोन आल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली होती. याप्रकरणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निर्मल नगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Gang) १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. आता आपले पुढील टार्गेट अभिनेता सलमान खानच्या जवळचे लोक असतील, अशी धमकीही दिली होती. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते.