

BMC Ganesh Mandal Fine
गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५ हजार रुपये दंड महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे. या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जुन्या नियमानुसारच २ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेऊ, असे लोढा यांनी म्हटले आहे. यामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाना दिलासा मिळणार आहे.
महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन हा निर्णय घेऊ, असे लोढा यांनी म्हटले आहे. नवीन सिमेंट काँक्रेट आणि अन्य रस्त्यांवर गणेशोत्सव मंडप उभारण्यासाठी खड्डे खोदल्यास मंडळांना एका खड्ड्यासाठी तब्बल १५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. यामुळे मंडप बांधायचा कसा? मंडपासाठी खोदलेल्या खड्ड्यांसाठी एवढा पैसा आणायचा कुठून?, असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांना पडला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ही नाराजी दूर करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन लोढा यांनी दिले आहे. तसेच येत्या १० दिवसांत मुंबईतील आगमन आणि विसर्जन मार्गातील खड्डे बुजवले जातील, असेही त्यांनी सांगितले.
पूर्वी प्रत्येक खड्ड्यासाठी २ हजार रुपये दंड वसूल केला जात होता. मात्र गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे खोदल्याने रस्त्याची दुरावस्था होत असल्याचे सांगत प्रत्येक खड्ड्यासाठी १५ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. या वाढीव दंडाला गणेशोत्सव मंडळांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.