

मुंबई : नवीन सिमेंट काँक्रेट व अन्य रस्त्यावर गणेशोत्सवामध्ये मंडप बांधण्यासाठी खड्डे खोदल्यास मंडळांना एका खड्ड्यासाठी तब्बल 15 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे मंडप बांधायचा कसा व मंडप बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांसाठी एवढा पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांना पडला आहे.
मुंबई शहर व उपनगरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. अशा रस्त्यांवर खोदकाम करण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे मुंबईत भर रस्त्यात मंडप घालून साजरा होणार्या गणेशोत्सवामध्ये खड्ड्यांचे संकट आले आहे. रस्त्यावरील बाप्पाची मूर्ती बसवण्यासाठी तब्बल 35 ते 40 फुटाचे मंडप घालण्यात येतो. त्यामुळे साहजिकच या मंडपासाठी भर रस्त्यात खड्डे खोदावे लागतात.
पूर्वी 2 हजार रुपये प्रति खड्डा दंड वसूल केला जात होता. मात्र गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे खोदल्यामुळे रस्त्याची होणारी दुरावस्था लक्षात घेऊन, या दंडामध्ये 15 हजार रुपये प्रति खड्डा अशी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळांचे आर्थिक गणितच कोलमडून जाणार आहे. त्यामुळे वाढीव दंडाला गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे.
मोजकी मंडळ सोडली तर अन्य मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी मुबलक निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात दीडशेपेक्षा जास्त मंडळ बंद पडली. मुंबईतील गणेश उत्सवाची ही संस्कृती टिकवण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने मंडप उभारणीसह अन्य परवानग्यासाठी लागणार्या शुल्कामध्ये मोठी कपात केली आहे. पण दुसर्या बाजूने महापालिका मंडळाकडून लाखो रुपये वसूल करत आहे.
रस्त्यावर खड्डे नको, याबद्दल दुमत नाही. पण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे भर रस्त्यात मंडप घालून उत्सव साजरा करावा लागतो. यासाठी कमीत कमी खड्डे पडतील याकडे मंडळाकडून लक्ष देण्यात येते. पण खड्डे न करता मंडप घालणे अशक्य आहे. मंडळ दंड भरायला तयार आहेत मात्र एका खड्ड्यासाठी 15 हजार रुपये दंड आकारल्यास दहा खड्ड्यांसाठी तब्बल मंडळांना दीड लाख रुपये दंड भरावा लागेल. पैसा आणायचा कुठून असा सवाल मंडळांनी केला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांसाठी दंडाची रक्कम वाढवण्यात येऊ नये यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात येणार असल्याचे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.