

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला मुंबईकरांचा, मूर्तिकारांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मूर्तिकारांना पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्याची सवय लागावी यासाठी त्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडूची माती व रंग मोफत देण्यात येणार आहेत.
पीओपी व अनैसर्गिक रंगामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. पूर्वी घरगुती गणेश मूर्तीही पीओपीच्याच बनत होत्या. मात्र गेल्या पाच वर्षापासून गणेश भक्तांनीच पर्यावरणपूरक मूर्तींना पसंती दर्शवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता घरगुती गणेशमूर्ती ८० टक्के पर्यावरणपूरक झाल्या आहेत.
गणेशमूर्ती घडवण्यासाठी शाडूची माती उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ही माती स्वखर्चाने उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून ही माती मुंबईत आणली जाते. या मातीचे मूर्तिकारांना लवकरच वाटप सुरू करण्यात येणार आहे. शाडूच्या मातीसह नैसर्गिक रंग मूर्तिकारांना गेल्या दोन वर्षापासून देण्यात येत आहेत.
२०२५ मध्ये १० हजार ८०० लिटर पर्यावरणपूरक रंगाचे मोफत वाटप करण्यात आले. मात्र रंगाची मागणी जास्त असल्यामुळे गेल्यावर्षी ऐनवेळी हे रंग मुंबई महापालिकेला पुरवता आले नाही. त्यामुळे काही मूर्तिकारांनी अनैसर्गिक रंगाने शाडूच्या मूर्ती रंगवल्या. याची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने यावेळी दुप्पटपेक्षा जास्त म्हणजे २५ हजार,४०० लिटर रंग खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाडूची मूर्ती घडवणाऱ्या प्रत्येक मूर्तिकाराला यंदा पुरेसे रंग मिळणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
मूर्तीची किमत उतरण्याची मुंबईकरांना अपेक्षा
मूर्तिकारांना शाडूच्या मातीसह नैसर्गिक रंग मुंबई महापालिकेकडून मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींची किंमत किमान यंदा तरी उतरेल अशी मुंबईकरांना अपेक्षा आहे. २०२५ मध्ये महापालिकेने शाडूची माती व रंगाचा पुरवठा करूनही मूर्तींच्या किमती जास्त राहिल्या होत्या. उदाहरणार्थ सव्वा फुटाच्या मूर्तीसाठी चार ते पाच हजार रुपये घेतले जातात. ही किंमत किमान दोन ते अडीच हजार असावी, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.