

दापोली : गणेशोत्सवाला अजून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी असला तरी दापोली तालुक्यातील मूर्तीकारांच्या कार्यशाळांमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. तालुक्यातील विविध गणेश चित्रशाळा आणि मूर्तीकारांच्या कार्यशाळांमध्ये शाडू माती व कच्च्या मातीपासून गणेशमूर्ती घडविणे, त्यांना अंतिम स्वरूप देणे, आकर्षक रंगकाम करणे आणि विविध देखाव्यांच्या मूर्ती साकारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कामांमुळे कार्यशाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा शाडू माती, रंग, सजावटीचे साहित्य तसेच मजुरीच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने मूर्तीकारांवर आर्थिक ताण निर्माण झाला असला तरी त्याचा गणेशभक्तांच्या उत्साहावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. उलट अनेक भाविकांनी आतापासूनच आपल्या पसंतीच्या मूर्तींची नोंदणी सुरू केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींनाच सर्वाधिक पसंती मिळत असून पारंपरिक रूपासह आधुनिक कलाकुसर आणि आकर्षक रंगसंगती असलेल्या मूर्तींची मागणी वाढत आहे. मूर्तीकार प्रत्येक मूर्तीला जिवंतपणा देण्यासाठी बारकाईने काम करत आहेत. गणरायाच्या चेहऱ्यावरील भाव, मुकुट, अलंकार आणि रंगसंगती यावर विशेष लक्ष दिले जात असून ग्राहकांच्या आवडीनुसार विविध आकारांच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. त्यामुळे कार्यशाळांमध्ये दिवसभर कामाची लगबग सुरू आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज
दापोली तालुक्यातील शिरवणे येथील मूर्तीकार मुकुंद महाडिक आणि वसंत महाडिक यांच्यासह अनेक कलाकार सध्या गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. वाढत्या खर्चाबाबत चिंता असली तरी यंदाच्या गणेशोत्सवाबाबत गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह असल्याचे मूर्तीकार सांगतात. ‘गणराय वर्षातून एकदाच घरी येतो. त्यामुळे त्याच्या मूर्तीच्या खरेदीत कोणतीही तडजोड केली जात नाही,’ अशी भावना भाविक व्यक्त करत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी दापोलीतील मूर्तीकारांच्या कार्यशाळांमधील लगबग अधिकच वाढू लागली असून गणरायाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज होत असल्याचे चित्र दिसत आहे.