

मुंबई : चेंबूर येथील एम/पश्चिम विभागातील ११ वा रस्ता येथील डायमंड उद्यान परिसरात शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी २४ तासांत एम.पश्चिम विभागातील सहाय्यक उद्यान अधिक्षक जगदीश भोईर आणि दुय्यम अभियंता (रस्ते) एम.पश्चिम अरूण मुंढे, योगेश पार्टे सहाय्यक अभियंता (रस्ते) आदींचे निलंबन केले आहे. तर सहाय्यक आयुक्त शंकर भोसले यांच्यावर टांगती तलवार असून चौकशी अहवालानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चेंबूर येथे ३० जून २०२६ रोजी दुपारी २.५८ वाजण्याच्या सुमारास एम/पश्चिम विभागातील ११ वा रस्ता येथे रस्त्यालगत असलेला पिंपळाचा वृक्ष उन्मळून युनिर्सल स्कूल, खासगी शालेय बसवर पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. सदर घटनेच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी आपला निष्काळजीपणा दिसून आला. ही बाब पाहता १ जुलै २०२६ रोजी पासून प्राथमिक/विभागीय चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले. तसे आदेश पालिका प्रशासनाने काढले.
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेप्रकरणी जबाबदार मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी आमदार तुकाराम काते यांनी विधानसभेत केली. तुकाराम काते यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत वेदनादायी असून एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले; त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण, ऑडिट आणि छाटणी करण्याची जबाबदारी पालिकेची असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाले. या निष्काळजीपणामुळे बळी गेला, अशी टीका त्यांनी केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, चेंबूरसह मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे विशेष सर्वेक्षण करून आवश्यक छाटणी किंवा हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर राबवावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी जबाबदारी निश्चित करणारी कठोर यंत्रणा उभारावी, अशी मागणी त्यांनी केली.
दुर्घटनेच्या चौकशीसाठी पालिकेकडून चौकशी समिती; १० दिवसात अहवाल देण्याचे निर्देश
चेबूर पश्चिम परिसरातील डायमंड गार्डनजवळ शाळेच्या बसवर पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू आणि १३ जखमी झाले होते. या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई महागनरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी दिले आहेत.