

राजेश सावंत
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय संपादन केलेल्या 84 प्रभागांसह त्यानंतर मनसेच्या 7 नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला प्रवेश अशा 91 प्रभागांवर शिवसेनेचा दावा असून, हे प्रभाग कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सोडण्यात शिवसेना तयार नसल्याचे समजते. त्याशिवाय अन्य 20 ते 25 प्रभागांसाठी शिवसेना आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 227 पैकी 150 प्रभागांत उमेदवार उतरवण्याची भाजपाची जय्यत तयारी सुरू आहे. एवढेच काय,तर महापालिकेत भाजपाचाच महापौर बसेल असे भाजपाकडून जाहीरपणे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे महानगरपालिकेत महापौर बसवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईतील शिवसेना पदाधिकार्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गटातील माजी नगरसेवकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे, तर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांत विद्यमान आमदारांसह माजी आमदार व वरिष्ठ पदाधिकार्यांवर महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महायुती झाली तरी, 2017 मध्ये विजय मिळवलेल्या 84 प्रभागांसह मनसेने प्रवेश केलेल्या सात प्रभागांवर शिवसेनेने दावा केला आहे.
जागावाटपात हे प्रभाग कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे शिवसेनेच्या आमदार व पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. 2017 मध्ये ज्या प्रभागांत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले ते प्रभाग महायुतीत अन्य पक्षाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पदाधिकार्यांचे म्हणणे आहे.
स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या प्रभागांसाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त 20 ते 25 प्रभागांसाठी शिवसेना आग्रही आहे. परंतु येथे वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे पदाधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेना - 84
भाजपा - 82
काँग्रेस - 31
राष्ट्रवादी काँग्रेस - 9
मनसे - 7
समाजवादी पार्टी - 6
एमआयएम - 2
अभासे - 1
अपक्ष - 5
भाजपा 150 प्रभागांत निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. त्यामुळे अवघे 77 प्रभाग शिल्लक राहणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसला 20 प्रभाग सोडले तरी, शिवसेनेच्या वाट्याला 57 प्रभाग राहतील.एवढे कमी प्रभाग घेण्यास शिवसेना तयार होणार नाही.किमान शंभर प्रभागांसाठी शिवसेना आग्रही राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे भाजपाला 127 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला 15 प्रभाग सोडल्यास भाजपाच्या वाटेला 112 प्रभाग येऊ शकतात. पण भाजपा एवढ्या कमी प्रभागात निवडणूक लढवण्यास तयार होणार नाही.भाजपा किमान 125 ते 130 प्रभाग मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती टिकवायची असेल तर शिवसेनेला आपल्या काही जागा सोडाव्या लागतील.