

BMC Contractor Knife Attack: मुंबई महापालिकेच्या (BMC) एफ-नॉर्थ विभागीय कार्यालयाबाहेर सोमवारी दोन कंत्राटदारांमध्ये वाद झाला. टेंडरच्या वादातून दोघांनीही एकमेकांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, महापालिका कार्यालयांतील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माटुंगा येथील एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयाबाहेर दोन्ही कंत्राटदारांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला आणि दोघांनीही एकमेकांवर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात एका कंत्राटदाराच्या पोटाला चाकू लागला, तर दुसऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
प्राथमिक तपासात हा हल्ला महापालिकेच्या टेंडर किंवा कंत्राटाच्या वादातून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमींची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवून पुढील तपास केला जाणार आहे.
माटुंगा पोलिसांनी दोन्ही कंत्राटदारांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी दाखल करत खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोघांनाही अटक करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर महापालिका कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाते. तरीही दोघे चाकू घेऊन कार्यालय परिसरात कसे पोहोचले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
घटनेनंतर एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.