

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेत विभाग स्तरांवर असलेल्या सहाय्यक आयुक्तांची महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिवाळीआधीच खांदेपालट केल्याने प्रशासनात उलटसूलट चर्चा रंगली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग संवर्गातील 7 पैकी 4 नव्या सहाय्यक आयुक्तांची नेमणूक झाली आहे.
महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून सहाय्यक आयुक्त पदाअभावी पालिका प्रशासकाला कार्यकारी अभियंत्यांना (प्रभारी सहाय्यक आयुक्त) पदावर नियुक्त करावे लागले होते. मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक आयुक्त संवर्गातील उमेदवार आल्याने प्रभारी सहाय्यक आयुक्तांना पदभार सोडावा लागत आहे. मंगळवारी पालिका आर.दक्षिण व सी वॉर्ड या विभागातील दोन प्रभारी सहाय्यक आयुक्तांची बदली करून त्यांना पुढील पोस्टिंगसाठी नगर अभियंता विभागाकडे पाठविण्यात आले.
बृहन्मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्त संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेद्वारे शिफारस केलेल्या चार अधिकार्यांच्या पद नियुक्तीचे आदेश आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये 3 ऑक्टोबर 2025 रोजी देण्यात आले आहेत. दरम्यान काही सहाय्यक आयुक्तांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. काहींकडे दोन वॉर्डांची जबाबदारी होती आता एकाच वॉर्डाचा पदभार देण्यात आला आहे. यामुळे महापालिकेच्या विविध विभागांतील प्रशासकीय कामकाजाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एकूण 14 उमेदवारांची शिफारस महापालिकेतील सहायक आयुक्त संवर्गासाठी करण्यात आली होती. त्यापैकी सहा जणांना यापूर्वीच पदभार देण्यात आला आहे. आता आणखी चार अधिकार्यांची नियुक्ती झाली आहे. उर्वरित चार अधिका-यांचा पदभार बाकी आहे.
दै.पुढारीची बातमी खरी ठरली
दै.पुढारीने 27 सप्टेंबर 2025 रोजी ऑक्टोबर महिन्यांतील पहिल्या आठवड्यात सात नवे सहाय्यक आयुक्त होणार असल्याचे वृत्त प्रसिध्द केले होते. ते अखेर खरे ठरले असून 7 पैकी 4 नव्या सहाय्यक आयुक्तांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त सहायक आयुक्ताची नेमणूक
संतोष गोरख साळुंके - सी विभाग
वृषाली पांडुरंग इंगुले - एफ दक्षिण विभाग
योगेश रंजीतराव देसाई - बी विभाग
आरती भगवान गोळेकर - आर. दक्षिण विभाग
यांची खांदेपालट
नितीन शुक्ला, सहायक आयुक्त (बी विभाग व के पूर्व अतिरिक्त कार्यभार) - के पूर्व विभाग
संजय इंगळे, (सी विभाग) नगर अभियंता विभागाकडे प्रत्यावर्तीत
महेश पाटील, (एफ दक्षिण विभाग) सहायक आयुक्त
एस विभाग
अलका ससाणे, (एस विभाग) सहायक आयुक्त, बाजार विभाग
मनीष साळवे, सहायक आयुक्त (आर.दक्षिण विभाग) - नगर अभियंता विभागाकडे प्रत्यावर्तीत
14 पैकी चार उमेदवारांना अद्याप पदभार नाही
एक उमेदवार पूर्वीच्या कार्यसंस्थेकडून अद्याप कार्यमुक्त झालेले नाहीत
एक उमेदवार प्रसूती रजेवर आहे
दोन उमेदवार विभाग संलग्नता प्रशिक्षण घेत आहेत