BLO Duty Teachers: बीएलओ ड्युटीमुळे पालिकेच्या ‘मिशन अ‍ॅडमिशन’वर परिणाम; शिक्षक अशैक्षणिक कामांत व्यस्त

विद्यार्थी पटसंख्या वाढीच्या मोहिमेला मोठा फटका
BLO Duty Teachers
BLO Duty TeachersPudhari
Published on
Updated on

मुंबई: मतदारयाद्यांच्या विशेष पुनरिक्षणासाठी शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्याचा परिणाम केवळ अध्यापनावरच नव्हे, तर मुंबई महापालिकेच्या शाळांमधील ‘मिशन अ‍ॅडमिशन’ मोहिमेवरही होत आहे.

शाळा सुरू झाल्यानंतरही अनेक शिक्षक बीएलओ आणि इतर अशैक्षणिक कामांत गुंतले असल्याने विद्यार्थी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला मोठा फटका बसत आहे.

महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून ‘मिशन अ‍ॅडमिशन’ मोहीम राबविली जाते.

‘एकच लक्ष्य, एक लाख प्रवेश’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात शिक्षक शाळांच्या परिसरातील वस्त्या, झोपडपट्ट्या आणि स्थलांतरित कुटुंबांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जनजागृती करतात. शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे पालकांमध्ये विश्वास निर्माण होत असल्याने या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

BLO Duty Teachers
Political News: आमदारांना संबोधित करायला उद्धव ठाकरे मैदानात; एकेका आमदाराची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर

कोरोनानंतर घटलेली विद्यार्थीसंख्या वाढविण्यात या मोहिमेने महत्त्वाची भूमिका बजावली. २०२२-२३ मध्ये एक लाख २६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. त्यानंतर २०२३-२४ मध्ये एक लाख नऊ हजारांपेक्षा अधिक प्रवेशांची नोंद झाली. २०२४-२५ मध्येही एक लाख प्रवेशांचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले होते. मात्र गेल्या वर्षी हे लक्ष्य पूर्ण करता आले नव्हते.

यंदा बीएलओ ड्युटी, जनगणना आणि इतर प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे व शैक्षणिक कामामुळे अनेक शिक्षक शाळेबाहेरील कामांत व्यस्त आहेत. काही शाळांमध्ये अध्यापनासाठीही मर्यादित शिक्षक उपलब्ध असल्याने शाळेनंतर वस्त्यांमध्ये जाऊन प्रवेश मोहीम राबविणे कठीण झाले आहे. परिणामी मिशन अ‍ॅडमिशनच्या गतीवर परिणाम झाला असून नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण घटल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

BLO Duty Teachers
Maharashtra Legislative Council Results: विधान परिषदेच्या ११ जागांचा आज निकाल; सांगली-सातारा, नाशिकच्या निकालाकडे लक्ष

विद्यार्थीसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास संचमान्यतेच्या निकषांनुसार शिक्षक पदांवरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आणि जनगणना यांसारख्या कामांसह प्रवेश मोहिमेचे नियोजन कसे करायचे, हा प्रश्न शाळांसमोर उभा राहिला आहे.

  • मुंबई महापालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये सध्या ३.१० लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मिशन अ‍ॅडमिशनमुळे विद्यार्थीसंख्येचे प्रमाण ४४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

  • ‘एकच लक्ष्य-एक लक्ष’ या मोहिमेअंतर्गत पालिका शाळांमध्ये दरवर्षी एक लाख नवीन प्रवेश मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. शिक्षक घरभेटीद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात.

  • प्रवेशसंख्या वाढल्यानंतर पालिकेने ‘मिशन मेरिट’ सुरू केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावून पालिका शाळांना खाजगी शाळांच्या बरोबरीचे बनवण्याचा प्रयत्न झाला.

  • बीएलओ, जनगणना आणि इतर अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना प्रवेश मोहिमेसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने मिशन अ‍ॅडमिशन मोहिमेवर परिणाम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news