दिलीप सपाटे
मुंबई : नगरपरिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाल्याने महापालिकांच्या जागा वाटपाच्या चर्चेत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. मुंबई, ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील महापालिकांसाठी युती करण्याबाबत भाजपा आणि शिवसेनेत बोलणी सुरू आहेत.नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपा अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेननेेही चांगले यश मिळविल्याने ते जागावाटपात समाधानकारक जागा मिळविण्याचा प्रयत्न करतील.
भाजपाने आधीच पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिंदेंच्या शिवसेनेशी मुंबई, ठाण्यासह कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर अशा मोजक्या ठिकाणी युतीबाबत बोलणी सुरू केली आहे. शिंदेंनी जागावाटपाची बोलणी करतानाच जास्त जागा मिळाव्यात म्हणून भाजपाने आग्रही भूमिका घेतली आहे.
मुंबईत एकनाथ शिंदे हे सुरुवातीला 227 पैकी 120 ते 130 जागांवर आग्रही होते. मात्र, भाजपा त्यांना 65 ते 70 च्यावर जागा सोडायला तयार नाही. मुंबईत शिवसेनेने भाजपाचा शब्द राखल्यास भाजपा ठाण्यात शिंदेंचा शब्द राखायला तयार होऊ शकते. मात्र, मुंबईचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे ठाण्यातदेखील युतीची चर्चा खोळंबली आहे. त्याचवेळी नवी मुंबईमध्ये शिंदेंशी युती करू नये म्हणून गणेश नाईक, तर कल्याण-डोंबिवलीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आग्रही आहेत. मीरा- भाईंदरमध्येही शिवसेना नेते मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद नवा नाही. काही केल्या भाजपला मुंबई महापालिका हवी आहे, तर शिंदेंवर मुंबईत ज्यांना पक्षप्रवेश दिले, ज्यांना ताकद दिली, त्यांना उमेदवारी देण्यासाठी दबाव आहे. शिवाय त्यांनी कमी जागा घेतल्या तरी त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे. आता बदलेल्या परिस्थितीत दोन्ही पक्ष काय निर्णय घेतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
दोस्तीत कुस्ती, सत्ताधाऱ्यांची रणनीती यशस्वी
सत्तेमध्ये एकत्र असताना भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात का लढत आहेत? यावर बरीच चर्चा निवडणुकीच्या दरम्यान झाली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकमेकांविरोधात लढून सत्ताधाऱ्यांनीच विरोधकांची स्पेस व्यापल्याचे स्पष्ट झाले आहे. आपसात लढून विरोधकांना विरोधकांची भूमिका बजावण्याचीही संधी द्यायची नाही. आपणच दोस्तीत कुस्ती खेळायची, कोणी जिंकला तरी विजय महायुतीचाच होणार हे गृहीत धरून भाजपाने स्वबळावर लढण्यावर भर दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही ताकद पणाला लावली. 288 पैकी दोनशेच्यावर नगराध्यक्ष निवडून आणून महायुतीने ही रणनीती नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीमध्ये यशस्वी ठरविली आहे.
आता तरी विरोधक एकत्र येणार का?
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाने महाविकास आघाडी धडा घेणार का? असा सवाल केला जात आहे. मुंबईमध्ये आधीच काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत एकत्र निवडणूक लढणार आहेत, तर शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. छोट्या शहरात लागलेल्या निकालांची पुनरावृत्ती महापालिकांसारख्या मोठ्या शहरातही होऊ शकते. अशावेळी विरोधक एकत्र येऊन सत्ताधारी पक्षांचा सामना करतात का? याबाबतही उत्सुकता आहे.