

मुंबई : शिवसेना शिंदे गट जागावाटपावर अडून बसल्याने आता भाजपने सध्यातरी चर्चा बंद करण्याचे ठरवले आहे असे समजते. पन्नास टक्के जागा द्या, न्याय हवा या मागणीसाठी कदाचित शिंदेसाहेब पुन्हा एकदा दिल्ली गाठतील असे त्यांच्या पक्षातर्फे सांगितले जाते आहे. 29 वॉर्डांत एकत्र लढण्याचे ठरले, पण नवी मुंबई, ठाणे, नाशिक येथे वाद सुरूच आहेत. जागावाटप चर्चा पुढे न्यायची दोन्ही पक्षांची तयारी आहे, मात्र मित्राच्या मागण्या रास्त नाहीत असे दोघांचेही मत झाले आहे.
मुंबईतील 150 जागांवर एकमत झाले असले तरी कुणी कोणत्या जागा लढायच्या याबाबत आता वाद सुरू झाले आहेत. मुंबईत 84 जागा आम्ही धनुष्यबाण चिन्हावर जिंकलो, 2 जागा पोटनिवडणुकीत जिंकलो, 200 मतांनी ज्या जागा हरलो त्यातही आम्ही पुढे होतो. आमच्या जागा त्यामुळे 125 असा जागांचा हिशोब शिवसेना सांगते आहे. आम्ही अधिकृत शिवसेना, चिन्ह आमचे, मराठी मते आम्ही आणू त्यामुळे आता या मागण्या मान्य करा असा आग्रह आहे.
2017 साली ज्या 15 वॉर्डात काँग्रेस, समाजवादी जिंकले त्या जागाही सेनेला अल्पसंख्याकांचा पाठिंबा असल्याने जिंकता येतील त्यामुळे त्या आमच्या आहेत असेही सेना म्हणते. या परिस्थितीत आता फडणवीस, शिंदे हे दोघेच काय ते ठरवू शकतात असे बोलले जाते. त्यातच केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी उपमुख्यमंत्री शिंदे पुन्हा करतील काय असा प्रश्न विचारला जातो आहे. युती तर होणार, मात्र जागेचा तिढा सुटत नसल्याने पुढे काय, कुणी कुठे लढायचे असे आजचे चित्र आहे.