नड्डांनी घेतला राजकीय हवामानाचा अंदाज; फडणवीसांच्या निवासस्थानी खलबते

BJP state president: j.p.nadda
BJP state president: j.p.nadda

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एकदिवसीय मुंबई दौर्‍यानंतर चौथ्याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही मुंबईत गणरायाचे दर्शन घेत मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकीय हवामानाचा अंदाज घेतला. लालबागच्या राजाशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर जाऊन नड्डा यांनी बाप्पांचे दर्शन घेतले. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गणरायाचे दर्शन घेऊन नड्डा यांनी बैठकीस सुरूवात केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीची एकजूट ही अजूनही राजकीय डोकेदुखी असून, ती निष्प्रभ करण्यासाठी काय करता येईल, यावर नड्डा यांनी सागर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खलबते केली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेला फडणवीस यांच्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. विशेष म्हणजे आपल्या पूर्वनियोजित दौर्‍यामुळे अमित शहा यांच्या बैठकीला गैरहजर राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार नड्डा यांच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. नड्डा यांनी या बैठकीत खासकरून शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या राजकीय ताकदीचाही आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते आणि नेते अद्याप आलेले नाहीत. या परिस्थितीत निवडणुकीच्या तयारीची माहिती नड्डा यांनी घेतली. शिंदे आणि अजित पवार हे लोकसभेच्या किती जागा जिंकू शकतील याचा आढावाही नड्डा यांनी घेतल्याचे समजते.

राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान उभे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा जिंकल्या. शिवसेनेने भाजपसोबत युती करून ही निवडणूक लढवली होती आणि त्यांचे 18 खासदार विजयी झाले होते. आता उद्धव ठाकरे भाजपसोबत नाहीत. दुसरीकडे शरद पवार यांनीही भाजपविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याशिवाय मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news