

Parinay Phuke Poem on Thackeray Brothers Rally
मुंबई : राज्य सरकारने पहिल्या वर्गांपासून हिंदी विषयाच्या सक्तीचा जीआर मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने शनिवारी (दि.५) वरळीत विजयी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याची तयारी केली आहे. या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत भाजप आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत विडबंनात्मक कविता सादर करून टोला लगावला आहे.
विधान परिषदेत नियम २६० अन्वये प्रस्तावावर बोलताना डॉ. परिणय फुके म्हणाले की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीच त्रिभाषा सूत्र स्वीकारले होते. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आहे, याबद्दल फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी हा मेळावा घ्यायला हवा होता,असे सांगत फुके यांनी विडंबनात्मक कविता सादर करून ठाकरे बंधूवर खोचक टीका केली.
''घरात आईला म्हणणार मम्मी
मोर्चा मध्ये जाणार आम्ही
कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण
मराठीचं करणार रक्षण
सुट्टीसाठी आहे युरोप
दुसऱ्यांवर करणार आरोप
सत्तेसाठी वेगळे झालो
आता सत्तेसाठी एकत्र आलो
लाथाडले जनतेने
आता काय करतील कोण जाणे
हिंदुत्वाचे कधी दुकान कधी प्यारे टिपू सुलतान
कास मराठीची धरली, निवडणुकीत केम छो वरळी
धारावीत दाखवला रुबाब, लुंगी बहादूर छोटे नवाब
भारत भर भारांबर चिंध्या
एक ना धड अस्तित्वाची धडपड
बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा
मोडीत काढला ठाकरे ब्रँड आता चहू बाजूने वाजला बँड''
अशी कविता सादर करून फुके यांनी ठाकरे बंधूंच्या वरळीतील मेळाव्यावर टीकास्त्र सोडले आहे.
दरम्यान, उद्याच्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क झाला नाही. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आलेला नाही. तर विजयी मेळाव्यापासून काँग्रस पक्ष दूर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे वरळी डोम मध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यामध्ये उपस्थिती राहणार नसल्याची माहिती समजते.
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अजूनही आहेत, जेव्हा शिवसेना फुटत होती. तेव्हा बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले, कुठेही जाऊ नको म्हणाले होते.मी रोज बाळासाहेबांना प्रार्थना करायचो. राज - उद्धव एकत्र येऊ दे. ती माझी प्रार्थना आता मान्य झाली आहे, अशी प्रतिक्रिया देताना ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे भावूक झाले.