

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आज गुरुवारी विधानसभेत संजय राऊत, रोहित पवार आणि एका यु ट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. जयकुमार गोरे यांनी मांडलेले तिन्ही हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी ते हक्कभंग समितीकडे पाठवित असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले.
एका यु ट्यूब चॅनलसह ८७ व्हिडिओ क्लिपमधून माझे कुटुंब, पक्ष आणि नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका सुरु असल्याचे गोरे यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जाणीवपूर्वक माझी बदनामी केली जात आहे. माझ्याविरोधात काही आमदारांचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र पाठवून निवेदन दिले. राज्यापालांना खोटे निवेदन देऊन तक्रार करणे, एखाद्या खोटे आरोप करून आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न चालू आहे. वडिलांच्या निधनानंतर अस्थिविसर्जनाचीही वाट पाहिली नाही. त्याआधी आरोप केले गेले. माझी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतरही बदनामी सुरु आहे. मी कोणत्या संस्थानिकांचा मुलगा नाही. सामान्याच्या घरात जन्माला आलेला राजकारणात पुढे जातो ही पोटदुखी असल्याची टीका गोरे यांनी केली.
अधिवेशन काळात मंत्री, सदस्यांनी नीट सहभाग घेऊ नये, हा कट करून असे आरोप केले जात आहेत. त्यामुळे तातडीने हक्कभंग स्वीकारायला हवा. हा हक्कभंग स्वीकारून अधिवेशन संपण्यापूर्वीच 'दूध का दूध, पानी का पानी' व्हावे. २६ मार्च पूर्वी या प्रकरणाचा निकाल लावा, अशी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी जयकुमार गोरे यांनी मांडलेले तिन्ही हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारून ते पुढील कार्यवाहीसाठी हक्कभंग समितीकडे पाठवित असल्याचे सांगितले.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडत सरकारवर टीकास्त्र सोडले. याच प्रकरणाचा धागा धरून खा. संजय राऊत यांनी ना. जयकुमार गोरे हे विकृत मंत्री असून त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली. यामुळे ना. गोरे पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात अडकले आहेत. हे आरोप खोडून काढत ना. जयकुमार गोरे यांनी संबंधित प्रकरणातून न्यायालयाने आपली निर्दोष मुक्तता केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.