

मुंबई : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडत सरकारवर टीकास्त्र सोडले. याच प्रकरणाचा धागा धरून खा. संजय राऊत यांनी ना. जयकुमार गोरे हे विकृत मंत्री असून त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली. यामुळे ना. गोरे पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात अडकले आहेत. हे आरोप खोडून काढत ना. जयकुमार गोरे यांनी संबंधित प्रकरणातून न्यायालयाने आपली निर्दोष मुक्तता केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, महायुती सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे उघड होत असून, पश्चिम महाराष्ट्रातील एका पैलवान मंत्र्याने एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे गंभीर प्रकरण आहे. त्या मंत्र्यावर शिक्षा होऊनही तो केवळ दहा हजार रुपये दंड भरून मोकळा झाला आणि पुन्हा त्या महिलेच्या मागे लागला आहे. महिलेला ब्लॅकमेल करण्यात आले. भाजपच्या मंत्र्यांचे वर्तन असे असेल, तर राज्यातील महिलांचे संरक्षण कसे होणार, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.
खासदार संजय राऊत यांनीही या विषयावरून ना. जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. स्वारगेटमध्ये जो प्रकार घडला तसाच प्रकार भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत घडला आहे. त्यांनी एका स्त्रीचा छळ केला आहे, असे राऊत म्हणाले.