

मुंबई: विधान परिषदेच्या 17 जागा आणि एका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महायुतीत पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम निर्णय प्रलंबित असतानाच भाजपने आपल्या कोट्यातील संभावित 12 जागांसाठी तब्बल 48 इच्छुकांच्या नावांची यादी तयार केली आहे. ही यादी घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेऊन उमेदवारांच्या नावांवर ते चर्चा करणार असल्याचे समजते. विधान परिषद निवडणुकांसाठी 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.
त्यामुळे एकीकडे महायुतीतील तिन्ही पक्षातील जागावाटप आणि दुसरीकडे आपल्या संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्याची कसरत सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण दिल्ली दौऱ्यात महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला आणि इतर तांत्रिक बाबींचा तपशीलही केंद्रीय नेतृत्वासमोर मांडणार असल्याचे समजते.
राज्यातील तिढा दिल्ली दरबारी
ठाणे, पालघर, नाशिक, कोकण, जळगाव, छत्रपती संभाजीनगरयवतमाळ आणि हिंगोली या मतदारसंघांवर शिंदे गटाचा दावा आहे. भाजप मात्र केवळ 4 जागांवरच तडजोडीस तयार आहे. त्यावर शिंदे गटाच्या काही स्थानिक नेत्यांनी ‘स्वबळ’ आजमवण्याचा आग्रह केला आहे. त्यामुळे राज्यातला हा तिढा दिल्ली दरबारी सोडविण्याच्या हालचाली सुरू आहेत.