चुकांची जबाबदारी सामूहिक; समन्वयाच्या अभावावरून भाजप नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडून कानउघाडणी

चुकांची जबाबदारी सामूहिक; समन्वयाच्या अभावावरून भाजप नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडून कानउघाडणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील अपयशावरून भाजप पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. राज्याच्या कोअर कमिटीतील समन्वयाच्या अभावावर नेमके बोट ठेवताना प्रत्येक नेत्याने जबाबदारीने आपला वाटा उचलायला हवा. विरोधकांच्या आव्हानाला कमी लेखू नका. किमान स्थानिक मुद्द्यांवरून होणारे आरोप तरी यशस्वीपणे खोडून काढा. सामूहिक जबाबदारीचे भान ठेवत झालेल्या चुका सुधारण्याचे निर्देशही पक्षश्रेष्ठींनी राज्यातील भाजप नेत्यांना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक मंगळवारी रात्री पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, पीयूष गोयल, प्रदेश प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे आदी नेते बैठकीला उपस्थित होते. निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, राजीनाम्याची गरज नाही. ही एकट्याची नाही, तर सामूहिक जबाबदारी आहे. ती स्वीकारून चुका सुधारायला हव्यात. अन्य नेत्यांना निष्क्रिय राहून चालणार नाही, असे पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी बैठकीत सांगितले.

फडणवीस काम करतात; मात्र महाराष्ट्र ही काही त्यांची एकट्याची जबाबदारी नाही. प्रत्येकाने आपापला वाटा उचलायला हवा, अशा शब्दांत सामूहिक नेतृत्वाचा मंत्रही भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे समजते. विरोधकांचा अपप्रचार खोडून काढण्यात आलेल्या अपयशावर पक्षश्रेष्ठींनी आपली नाराजी स्पष्ट केली. स्थानिक मुद्दे खोडून काढण्यात अपयशी ठरू नका, असे सांगतानाच विदर्भातील कापूस, सोयाबीन, उत्तर महाराष्ट्रात कांदा, तर संविधान बदल व आरक्षण काढणार असल्याच्या प्रचाराबाबतही बैठकीत मंथन झाले.

केंद्रीय नेतृत्वाची असेल नजर

राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आता केंद्रीय नेतृत्व लक्ष ठेवणार आहे. शिवाय, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने दिल्लीत आणखी खलबते होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभेसाठी तत्काळ योजना आखावी, त्या योजनेवर प्रभारी आणि सहप्रभारींच्या उपस्थितीत मुंबईत कोअर कमिटीची बैठक घेऊन चर्चा करण्याचे ठरल्याचे समजते.

पंकजा मुंडे यांच्याकडे जबाबदारी

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्याकडे काही कामे सोपविली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः, ओबीसी विषयात त्यांनी पुढाकार घेत काम करावे, अशा सूचनाही श्रेष्ठींनी केल्याचे सांगितले जात आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लगेच निश्चित करा. निवडणूक रणनीतीचे बारकाईने नियोजन करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news